Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘शाळा बंद’ वर गुरूजी ठाम!

Ahilyanagar : ‘शाळा बंद’ वर गुरूजी ठाम!

शिक्षण विभाग म्हणते वेतन कपात करणार || शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिक्षकांसाठीची टीईटीची जाचक अट रद्द करावी, जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आज (दि. 5) रोजी शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाने शाळा बंद राहिल्या तर शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा इशारा दिला आहे. यामुळे एकीकडे शिक्षक आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत असून दुसरीकडे शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, शिक्षण विभागाने एक दिवसाचे वेतन कपात केले तरी आता माघार घ्यायची नाही, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे. राज्यातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, विनाअनुदानित अशा जवळपास 25 हजार शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने आंदोलनामध्ये सहभागी होणार्‍यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत.

YouTube video player

शासनाने वेतन कपात केले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही. संचमान्यतेमुळे ग्रामीण भागासह राज्यातील जवळपास 25 हजार शाळा बंद होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची फार गरज आहे. संचमान्यता आणि टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता 5 डिसेंबरला राज्यभरात शाळा बंद ठेवणार, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

शिक्षकांच्या मागण्या
शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यासंबंधी राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. आरटीई कायदा कलम 23 मध्ये टीईटीबाबत सुधारणा करण्यासह एनसीटीईच्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक पावले तातडीने उचलण्यात यावीत, टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया शीघ्र सुरु व्हावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत बहाल करावी, संचमान्यता शासन निर्णय 15 मार्च 2024 तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करावे, पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी शिक्षक हे आंदोलन करत आहेत.

शिक्षण विभागाचा आदेश
बंदच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक संचालक महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकार्‍यांना परिपत्रक काढून विद्यार्थी हीत लक्षात घेता 5 डिसेंबर रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची दक्षता घ्यावी, तसेच ज्या शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...