Saturday, May 2, 2026
Homeक्रीडाTeam India Victory Parade : मुंबईत रंगणार टीम इंडियाचा भव्य विजय परेड...

Team India Victory Parade : मुंबईत रंगणार टीम इंडियाचा भव्य विजय परेड आणि रोड शो; तारीखही आली समोर, लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । Mumbai

भारताने ICC Men’s T20 World Cup 2026 जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या भव्य विजय परेडकडे लागले आहे. बीसीसीआयकडून अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले तरी सूत्रांच्या माहितीनुसार विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मोठ्या जल्लोषात रोड शो आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू सर्वप्रथम नवी दिल्लीत पोहोचू शकतात. येथे संघातील खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांशी भेटीनंतर संपूर्ण संघ दिल्लीहून मुंबईकडे रवाना होईल. मुंबईत 11 किंवा 12 मार्च रोजी टीम इंडियाचा भव्य रोड शो आयोजित करण्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या विजय सोहळ्याचा समारोप ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम येथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे मोठा समारंभ आयोजित करून बीसीसीआयकडून संपूर्ण संघाचा सत्कार केला जाईल आणि विजेत्या खेळाडूंना विशेष बक्षीसही प्रदान केले जाईल. मुंबईतील हा विजय रोड शो क्रिकेट चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. 2007 आणि 2024 मध्ये झालेल्या विजयी परेडच्या आठवणींना उजाळा देणारा हा सोहळा असणार आहे.

प्राथमिक नियोजनानुसार खेळाडूंचा रोड शो नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर ओपन बसमधून काढला जाऊ शकतो. या मार्गावर हजारो क्रिकेटप्रेमींची गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे. गेल्या वर्षी मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणात जमलेल्या चाहत्यांचा अनुभव लक्षात घेऊन यंदाही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत ठेवण्याची तयारी सुरू आहे. मुंबई पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी विशेष योजना तयार केली जात आहे. चाहत्यांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा यासाठी वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा कर्मचारी आणि आपत्कालीन सुविधा यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषकावर पुन्हा नाव कोरले. या विजयाचा आनंद खेळाडूंनी मैदानावरच उत्साहात साजरा केला. संघातील खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही या ऐतिहासिक क्षणाचा आनंद लुटला. अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन या तिघांनी धडाकेबाज फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने 20 षटकांत पाच गडी गमावत तब्बल 255 धावा उभारल्या.

भारताने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर सतत दबाव ठेवला. जसप्रीत बुमराह याने शानदार गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल याने तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचा डाव रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 159 धावांवर बाद झाला आणि भारताने दिमाखदार विजय मिळवत पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्वांचे लक्ष मुंबईत होणाऱ्या संभाव्य विजयी परेडकडे लागले आहे. लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत टीम इंडियाचा हा गौरव सोहळा संस्मरणीय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...