जळगाव-Jalgaon
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची वेळोवेळी छेड काढून तिचा छळ करणार्या तिच्या गावातीलच तरुणाविरोधात जुलै २०१७ मध्ये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात बुधवार ११ ऑगस्ट रोजी जळगावात जिल्हा न्यायालयाने तरुणास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तरुण घरी तसेच तसेच ती शाळेत जातांना तिचा पाठलाग करुन छळ करत होता. २७ जुलै २०१७ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुलीचे आईवडील हे कीर्तनास गेले होते. मुलगी घरी एकटी असतांना तरुण घरी आला व त्याने तिचा छळ केला होता. मुलीच्या आई वडीलांनी समजूत काढल्यानंतरही तरुण ऐकत नसल्याने याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन तपासअधिकार्यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या. आर.एम.जाधव यांच्या न्यायालयात हा खटला चालला. बुधवार, ११ ऑगस्ट रोजी खटल्याच्या निकालावर कामकाज झाले. पिडीत मुलीसह, ती शिकत असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक अशा सहा जणाच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. यात तरुणाला दोषी धरण्यात आले.
न्या. जाधव यांनी तरुणाच्या भविष्याचा व वयाचा विचार करता, त्यास कोर्ट उठेपर्यत एक दिवसाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड. निलेश चौधरी यांनी काम पाहिले