Friday, May 3, 2024
Homeनाशिकडाळिंबावर तेल्या रोगाचे थैमान

डाळिंबावर तेल्या रोगाचे थैमान

पंचाळे । वार्ताहर

परिसरातील ४०ते ५० डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांच्या डाळींब बागांवर तेल्या रोगाने थैमान घातले असून हातातले पिक गेल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

यावर्षी पाऊस वेळेवर सुरू झाला. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी डिसेंबर-जानेवारी महिन्यात डाळिंब बहार धरला. जून महिन्यापर्यंत फळे चांगली आली. मात्र, नंतर सर्वच बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला. शेतकर्‍यांनी लाखो रुपयांची किटकनाशके फवारली. तरीही फळे चांगली येऊनही फळास काळपट चट्टे येऊन फळे झाडावरच सडू लागली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी झाडावरील फळे काढून रस्त्याच्या नालीमध्ये फेकून दिली.

एरवी हजार ते बाराशे रुपये किमतीत वीस किलोची कॅरेट विक्री होत असताना काळपट फळे शंभर ते दोनशे रुपये कॅरेटप्रमाणे व्यापार्‍यांना विकावी लागली. डाळिंब काढण्यासाठी मजुरी वाहतूक यावरच ५० टक्के खर्च झाला असून तेल्या रोगाने ९०% डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. पंचाळे परिसरांमध्ये ६० ते ६५ शेतकर्‍यांनी जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा लावल्या आहेत. वर्षभर जमीन डाळिंब बागेसाठी अडकवूनही समाधानकारक उत्पन्न होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी यापूर्वीच डाळिंब बागा काढून टाकल्या आहेत.

यंदाच्या तेल्याच्या या संकटामुळे अनेक शेतकरी डाळींब बागा काढण्याच्या विचारात आहेत. शासनांकडून डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना कुठलीही ंठोस मदत होत नसल्याने ‘नको ती डाळिंब बाग’ असे म्हणत अनेक शेतकर्‍यांनी डाळिंब बागांवर कुर्‍हाड चालवून बागा नष्ट करण्याचे काम चालवले आहे .

मी दोन एकर डाळिंब बाग २०११ मध्ये लावली होती. दरवर्षी चांगले उत्पादन होत होते. यावर्षीही खते, कीटकनाशके यावर चार लाख रुपये खर्च केले. मात्र, पीक काढणीच्या वेळी डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळांवर काळे चट्टे पडले. फळे सडली. त्यामुळे २० क्विंटल सडलेले डाळींब फेकून द्यावे लागले. दहा लाख रुपये उत्पन्न गृहीत धरलेले असताना यावर्षी फक्त 35 हजार रुपये उत्पन्न झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात औषधे, कीटकनाशके, खते, मजुरी यावर झालेला पाच लाखांचा खर्च कसा वसूल करायचा? पिक विमा उतरवलेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून अर्थ सहाय्य करण्याची गरज आहे.

भाऊसाहेब शेंद्रे, डाळिंब उत्पादक

- Advertisment -

ताज्या बातम्या