अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या राज्यातील शिक्षकांनी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संच मान्यतेच्या आदेशाविरोधात देखील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून यामुळे येत्या 9 नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघटनांनी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सर्व शिक्षक हे सहकुटूंब सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेसंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार किती विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असणार हे निश्चित करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, आरटीई अधिनियमात दुरुस्ती करावी, अशी शिक्षक संघटनांची मागणी करावी, शिक्षणसेवक पद कायमचे रद्द करावे. अभी नही, तो कभी नही असे ब्रीद तयार करून राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सरकार विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या 9 नोव्हेेंबरला रविवारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षक संघटनांच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी स्वतःच्या अस्तित्वासाठी, सर्व शिक्षक व संघटना यांनी मतभेद, गट-तट बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षकांच्या मध्यवर्ती संघटनेने केले आहे. दरम्यान, 4 ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षकांच्या बाजूने आश्वासन दिले होते. पण, महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नसल्याने शिक्षकांनी आता पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे शिक्षक संघटनांच्यावतीने सांगण्यात आले.
असे आहे नियोजन
मूक मोर्चापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यात 2 ते 5 नाव्हेंबर दरम्यान खासदार, आमदार व मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर 3 नाव्हेंबरला सर्व संघटनाच्या जिल्हाध्यक्षांनी 9 नोव्हेंबरच्या मार्चाच्या ठिकाण व वेळेबाबत जिल्हाधिकारी, संबंधीत पोलिस ठाणे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावेत, असे शिक्षकांच्या मध्यवर्ती संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.




