अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपध्दती यापूर्वी वेळोवेळी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाली आहे. ही बाब विचारात घेऊन शिक्षण विभागाने यापूर्वी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे. आता नव्या तरतुदीनुसार, उमेदवाराने चालू टीईटी परिक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या 13 ऑक्टोबर 2023 रोजीच्या निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणार्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल, अशी यापूर्वी तरतुद होती. शिक्षण विभागाने वयाच्या अटीमध्येही बदल केले आहे.
10 नोव्हेंबर 2022 च्या जीआरनुसार, भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल, असे म्हटले होते. ही तरतूद बदलण्यात आली असून नव्या तरतुदीनुसार, पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
रिक्त पदांसाठीच्या प्राधान्यक्रमांमध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या तरतुदीनुसार, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि, उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. आधीच्या तरतुदीनुसार सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येत होते.
सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पध्दती अवलंबिणार्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेमध्ये सुधारित तरतूद लागू करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते दहावी या गटांसाठी त्या-त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की, मराठी, ऊर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करताना काही शिक्षण संस्थांकडून होत असलेल्या अडवणुकीचा फटका अनेक भावी शिक्षकांना बसत आहे. पवित्र पोर्टलमार्फत निवड होऊनही शिक्षकांना नियुक्ती नाकारल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याविरोधात शिक्षण विभागाने आता कडक पावले उचलली असून अशा शिक्षण संस्थांवर जरब बसविण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने काल एका शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेतील काही तरतुदींमध्ये बदल केला आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
हे प्रकार रोखण्यासाठी मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यांतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी, अशी नवी सुधारणा करण्यात आली आहे. काहीवेळा मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत. आता या प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे.
मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकास तीन या प्रमाणात उदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार उमेदवारांनी देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त तीन प्राधान्यक्रमावर शिफारस होईल. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनंकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.





