मुंबई | Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये मुंबईसंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी महेश मांजरेकर यांनी मुंबईसंदर्भात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सविस्तर भाष्य केले.
“मी जेव्हा आज घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते. माझी मुले याच शहरात वाढणार आहेत, याचा विचार केला की भीती वाटते,” अशा अत्यंत टोकदार आणि भावनिक शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीवर आपली खंत व्यक्त केली.
“गेल्या तीन वर्षांत महानगरपालिका निवडणुका झाल्याच नव्हत्या. मग त्या तीन वर्षांत मुंबई धोक्यात नव्हती का? एक मुंबईकर म्हणून जेव्हा मी आज घराबाहेर पडतो, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स १८३ आहे”, असे महेश मांजरेकरांनी म्हणताच उद्धव ठाकरेंनी घसा दुखत असल्याचे सांगत “ते आज मी भोगतोय” असे म्हटले.
विकास म्हणजे नेमके काय?
विकास म्हणजे नेमके काय? उद्धव ठाकरे म्हणाले की, सरळ घरापासून हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता म्हणजे विकास नव्हे. हॉस्पिटल कमी लागतील, नागरिकांचे आयुष्य सुरक्षित आणि निरोगी राहील, असा विकास अपेक्षित आहे. मुंबईकर मोठ्या प्रमाणात कर भरतो, मात्र त्या बदल्यात प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अस्वस्थ जीवनशैली मिळत असेल, तर हा विकास कशासाठी, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबई की पुणे मांजरेकरांनी सांगितला अनुभव
मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलत असताना पुणे की मुंबई याचाही अनुभव सांगितलं. मुंबईतील गर्दी आणि तणावाला कंटाळून महेश मांजरेकर काही काळ पुण्यात राहायला गेले होते. मात्र, सहा महिन्यांनंतर ते पुन्हा मुंबईत परतले. तरीही, सध्याची परिस्थिती पाहता मुंबईतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मुलांचे भवितव्य या शहरात सुरक्षित आहे का, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




