Friday, May 17, 2024
Homeनाशिक९२ वर्षांच्या आजोबांनी केली करोनावर मात

९२ वर्षांच्या आजोबांनी केली करोनावर मात

मनमाड । प्रतिनिधी

प्रबळ इच्छाशक्ती आणि जगण्याच्या उमेदीमुळे तब्बल 92 वर्षाच्या आजोबांनी करोनाच्या रूपाने आलेल्या यमराजाला माघारी जाण्यास भाग पाडल्याची सुखद घटना शहरात समोर आली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे या आजोबांना वेगवेगळे आजार असतांना देखील त्यांनी केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर करोनावर यशस्वी मात केली. शासनाच्या नियमांचे पालन केल्यास करोनाला चारीमुंड्या चीत करता येवू शकते, असा संदेश या आजोबाने करोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना दिला आहे

शहरातील हुडको परिसरात राहणारे नामदेव शिंदे (92) आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. एक वर्षापूर्वी त्यांना हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला होता मात्र त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. त्यानंतर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या खुब्याची शस्त्रक्रिया करावी लागली. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास देखील आजोबांना आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विळख्यात आजोबा सापडले आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अगोदरच वेगवेगळे आजार आणि आता करोना झाल्याचे पाहून त्यांच्या घरातील मंडळींची चिंता वाढली आणि त्यांनी आजोबांना अगोदर खाजगी डॉक्टरांकडे घेऊन गेले त्यानंतर नांदगावच्या ऑक्सिजन करोना सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

करोना सेंटरमध्ये उपचार घेत या आजोबांनी करोनाला सपशेल धूळ चारत चारीमुंड्या चित केले असून प्रबळ इच्छाशक्ती व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास करोनावर मात करता येते हे या 92 वर्षीय आजोबांनी सिद्ध करून दाखवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या