Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखपर्यटनस्थळांची सुरक्षा प्रशासनच वाढवू शकते!

पर्यटनस्थळांची सुरक्षा प्रशासनच वाढवू शकते!

त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्यावर काल पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना घडली. या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले 23 जण दरीमध्ये अडकून पडले होते. अनेक तास प्रयत्न केल्यावर त्यातील 22 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. एक जण मात्र त्याच्या कुटुंबियांच्या देखत पाण्यात पडून वाहून गेला. अर्थात त्या ठिकाणचा हा काही पहिलाच अपघात नव्हे. नाशिक जिल्ह्याचा परिसर धरणे आणि धबधब्यांनी संपन्न आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटन दरवर्षी बहरतच आहे.

हंगामी पर्यटन हंगामी रोजगारही निर्माण करते. धरण आणि धबधब्यांच्या परिसरातील आदिवासींनाही यानिमित्ताने चार पैसे गाठीला बांधण्याची संधी मिळते. स्थानिक व्यापाराचीही वाढ होते हेही विसरता येणार नाही. त्यामुळे पावसाळी पर्यटन स्थळे निर्धोक होतील आणि पर्यटक पर्यटनाचा निर्भेळ आनंद उपभोगू शकतील याची दक्षता प्रशासनाने घ्यायची की अपघात घडतात म्हणून पर्यटनस्थळांवरच बंदी घालायची? सध्या ‘विकेंड’ पर्यटनाचा कल वाढत आहे.

- Advertisement -

लोक शनिवार-रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून सहकुटुंब सहलीला जातात. त्याला जोडून एखादी शासकीय सुट्टी असली तर त्यांच्यासाठी तो दुग्धशर्करा योगच ठरतो. ज्यांना ते शक्य नसते ते अशा एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन रविवारचा दिवस तरी मजेत घालवायचा प्रयत्न करतात. तात्पर्य शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पर्यटनस्थळे गर्दीने ओसंडून वाहातात. नाशिक जिल्हा परिसरातील पर्यटनस्थळी शनिवार-रविवार जाण्यावर बंदी घालून प्रशासनाला काय साधायचे असावे? अपघात फक्त याच दोन दिवशी होतात.

आठवड्याच्या अन्य वारी मात्र पर्यटनस्थळांवर कोणतेही अपघात होत नाहीत असा प्रशासनाचा भाबडा समज आहे का? अनेकदा कुठल्याही समस्येचा उपाय म्हणून सोपी पळवाट शोधण्याचा शासनाकडून प्रयत्न होतो. दुगारवाडीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा बंदीचा राग आळवला. धबधब्यावर जाण्यास फक्त शनिवारी व रविवारी बंदी घातली. याआधीही जिल्हा परिसरातील अनेक पावसाळी पर्यटन स्थळे तात्पुरती बंद केली होती. फक्त हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी वनविभागाची परवानगी बंधनकारक केली आहे. धबधब्याच्या स्थळी भेट देण्याचे आकर्षण हे सर्व दिवशी सारखेच असते. म्हणून केवळ शनिवारी-रविवारी बंदी घालून कसे चालेल? अन्य दिवशी गर्दी कमी असली तरी अपघाताचा संभव कायमच असतो.

‘कुर्तालम’हे तामिळनाडू राज्यातील प्रसिद्ध पण छोटेसे पर्यटनस्थळ. त्या परिसरात 15-20 धबधबे आहेत. तिथे तामिळनाडू शासनाच्या तीन विभागांची विश्रामगृहे आहेत. ज्या धबधब्यांवर दुर्घटना घडू शकते अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे. धबधब्यांतून वाहाणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला स्नानाच्या ठिकाणी कठड्यांची कायमची कुंपणे घातली आहेत.

धोका टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुर्तालम हे पर्यटकांचे पसंतीस्थान बनले आहे. पर्यटनस्थळांवरचे अपघात रोखण्यासाठी अशी दूरदृष्टी राज्यासह स्थानिक प्रशासनानेही दाखवली पाहिजे. कारण पर्यटक धोका त्याच्या खुशीने पत्करतो असे म्हटले तरी शेवटी त्याचा जीव गेला तर त्याचा ठपका संबंधित सर्वांवरच येतो. त्यात प्रशासनाचाही समावेश असतो. अर्थात, पर्यटकांनाही स्थळ-काळ आणि वेळेचे भान ठेवायलाच हवे. धबधबे आणि धरण परिसरात गेल्यावर, गिर्यारोहण करताना अनावश्यक धाडस दाखवू नये.

निसर्गाच्या शक्तीला गृहित धरू नये. गोंधळ घालू नये. खोल खळाळत्या पाण्यात उतरु नये. अनोळखी दर्‍याखोर्‍यांमध्ये जाण्याचा अनाठायी मोह देखील टाळावा. तथापि सुरक्षित पर्यटनस्थळे विकसित करण्याची जबाबदारी शासनाची आहे याचा विसर पडून चालेल का? दुर्घटनेला फक्त पर्यटकांना जबाबदार धरुन यंत्रणेला मोकळे होता येईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या