मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
सोमवारी रात्री साडेआठ वाजेनंतर तालुक्यातील अजंग येथून घरातून बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह गावालगत असलेल्या मोसम नदीकाठावरील विहिरीत आज सकाळी आढळून आल्याने गाव परिसरात एकच खळबळ उडाली. बालिकेचा मृतदेह विहिरीत तरंगताना पाहून संतप्त झालेल्या नातेवाईक व महिला तसेच ग्रामस्थांनी बालिकेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत नराधम आरोपीस अटक करावी या मागणीसाठी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत तो उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवला. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. सदरचे कृत्य करणार्यास लवकरात लवकर अटक करत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संधू यांनी संतप्त ग्रामस्थांना दिल्यानंतर एक तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
चंदनपुरी गावातील रिक्षाचालक ज्ञानेश्वर लालचंद महाले यांची कन्या भाविका महाले (8) ही शिक्षणासाठी अजंग येथील प्रशांतनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या आजी निर्मला शेलार यांच्याकडे वास्तव्यास होती. मालेगाव येथील भारत विद्यालयात दुसरीत शिकत असलेल्या भाविकाने सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आजीबरोबर जेवण केले. यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास गावातील एकाकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने आजी निर्मला शेलार भाविकास घरात खाटेवर झोपवून पुरणपोळी करण्यासाठी जाधव यांच्याकडे गेल्या.
मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निर्मला शेलार घरी परतल्या असता त्यांना घरात भाविका नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने त्यांनी आरडाओरड करत परिसरात राहणार्या निंबा बोरसे, रूपेश जाधव, केदारनाथ महाले, रामदास गोविंद यांना नात भाविका घरात नसल्याचे सांगितल्याने त्यांनी भाविकाचा गावात शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात भाविकाचे वडील ज्ञानेश्वर महाले यांनी मुलगी भाविकाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेपत्ता झालेल्या भाविकाचा कुटुंबियांसह पोलिसांतर्फे सर्वत्र शोध गत दोन दिवसांपासून घेतला जात होता.
दरम्यान, आज सकाळीही भाविकाचा शोध घेतला जात असताना गावालगतच मोसम नदीकाठावर असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहिरीत भाविकाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भाविकाचा घातपात झाल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ केला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी अधिकार्यांसह घटनास्थळी धाव घेत विहिरीतून बालिकेचा मृतदेह बाहेर काढत तो उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवला व नंतर सदर मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
रास्ता रोको आंदोलन करणार्या संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत भाविकाच्या मारेकर्यास अटक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. स.पो. अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून योग्य तो तपास सुरू करण्यात आला आहे. संशयिताचा त्वरित शोध घेत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही संधू यांनी दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.