नंदन रहाणे
आपला हा हिंदूधर्म एखाद्या विशाल महानदासारखा आहे. महानद म्हणजे काय? तर गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या महानद्यांपेक्षाही ज्याचा प्रवाह मोठा असतो तो… भारतात असे महानद दोन आहेत. एक आहे सिंधू व दुसरा आहे ब्रह्यपुत्र! महानदाचे वैशिष्ट्य असे असते की त्यात अनेक प्रवाह, उपप्रवाह, लघुप्रवाह एकाच विशालकाय पायातून वाहात असतात… हिंदू धर्मही अगदी तसाच आहे. शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य, नाथ, दत्त असे अनेक संप्रदाय हिंदू धर्मात आहेत. पुन्हा त्यांचेही प्रदेशानुरुप वेगवेगळे अवतार आहेत.
तामिळनाडुतला मुरुगन राजस्थानात माहित नसतो आणि महाराष्ट्रातला खंडोबा बंगालात ठाऊक नसतो. मात्र, अशा देवांनाही विशिष्ट प्रदेशात लाखोभक्त असतातच. वारकरी संप्रदाय हाही एक असाच प्रदेशानिविष्ट पंथ आहे खरा… पण त्याची गोष्टच वेगळी आहे. मुळात तो वैष्णव पंथाच्या अंतर्गत असा एक संप्रदाय. मात्र, त्यातल्या संताचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की तोच महाराष्ट्राचा मुख्य लोकधर्म बनून गेली 700 वर्षे गाजतो आहे! नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव हे प्रारंभीचे संत इतके उदार आणि सर्वसमावेशक होते की त्यामुळे समाजातील सर्व जातींना, सर्व स्तरांना व आपलेसे वाटले आणि त्यांच्यातूनही मग भक्त, कवी व संत निर्माण झाले… तेरढोकीचे गोराकुंभार हे असेच एक संत. त्यांची नामदेवांशी मैत्री जुळली व तेही अभंग लिहू लागले. त्यांनी एका अभंगात संत काय किमया करतात, ते सांगितले आहे –
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले।
उद्धरावया आले ।
दीन जना ॥1॥
ब्रह्मादिक ज्यांची
वंदिती पायवणी ।
नाम घेता वदनीं ।
दोष जाती ॥2॥
हो का दुराचारी विषयी
आसक्त ।
संतकृपे त्वरित ।
उद्धरती ॥3॥
अखंडित गोरा
त्यांची वार पाहे।
निशिदिनीं ध्याये ।
संतसंगा ॥4॥
गोरोबाकाका म्हणतात, संत जरी हाडामांसाच्या रुपातली माणसे दिसत असली ते प्रत्यक्ष ब्रह्यमूर्तीच आहेत. ब्रह्य म्हणजे सगळ्या विश्वामधील सर्वश्रेष्ठ भक्ती, जी अत्यंत पवित्र आहे. ती निर्गुण निराकार निरावयव असते. ज्ञानी लोकज्ञान मार्गाने आणि योगीजन योगमार्गाने तिचा शोध घेण्याचा जन्मोजन्मीं प्रयत्न करतात, पण ती काही त्यांच्या आवाक्यात येत नाही, मात्र, तिला जेव्हा सगुण साकार सावयव व्हावेसे वाटते, तेव्हा ती संतांच्या रुपात पृथ्वीतलावर प्रकट होते. संतांची देहाकृती धारण करण्यात तिचा हेतू काय असतो? तर, जे कोणी दीन आहेत, पतित आहेत, मूढ आहेत… त्यांचा उद्धार करावा हाच परमपवित्र ब्रह्यशक्तीचा एकमात्र उद्देश असतो व संतांच्या मानवी आयुष्यात तोच ती साध्य करते. संत केवळ उपकार करण्यासाठीच प्रकट झालेले निर्दोष निष्कलंक पुण्यात्मे असतात. त्यांची पात्रता किती असते? तर प्रत्यक्ष ब्रह्या, वरुण, इंद्र, अग्नी अशा देवतांनीही ज्यांच्या पायाचे तीर्थ पवित्र मानून नमस्कार करावा. इतक्या उच्च कोटीचे अवतार संत असतात. त्यांचे नुसते नामस्मरण जरी केले तरी सगळे दोष झडून जातात.
जे जे कुणी मानवी जन्माला येऊन नाना प्रकारचे दुराचार करतात किंवा कामोपभोगातच मग्न राहतात. त्यांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य या संतांमध्ये असते. तेही कसे? तर अगदी त्वरित! पापी माणसाने आपला उद्धार व्हावा अशी इच्छा धरणे आणि त्यासाठी संतांचे स्मरण करणे अथवा त्यांच्या जवळ जाणे हीच केवढी मोठी गोष्ट आहे.. मग अशा पश्चात्तापाने पोळलेल्या दुष्ट व्यक्तीचा उद्धार संत करणार नाहीत. तर कोण करील? ते एका क्षणात ती जादु करतात! इतके स्पष्ट आश्वासन एका संतानेच दिल्यानंतर, तो संप्रदाय मर्यादित लोकांचा राहु शकतो काय? वारंकरी संप्रदायाकडे सर्व वृत्तीप्रवृत्तीच्या जनांची रीघ लागली व तो भक्तीचा महानद ठरला. संत गोराकुंभार म्हणतात. मी देखील अशाच संतांची वाट पाहात आहे व रात्रंदिवस त्यांच्या सहवासाची इच्छा धरीत आहे…




