सिन्नर । Sinnar
नाशिक-पुणे महामार्गावर (nashik pune highway) नांदूरशिंगोटे बायपासवर (nandurshingote bypass) आज (दि.17) पहाटे 3 च्या सुमारास एक कारच्या इंजिनला आग लावून संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने चालक कारमधून बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला….
बुधवारी (दि. 16) पहाटे सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar Ghoti Highway) घोरवड घाटात (Ghorwad Ghat) एक कारला आग लागून चालकाचाही होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पहाटेच्या सुमारास नांदूर बायपास परिसरात एका कारने पेट घेतला.
कारच्या इंजिनमधील बिघाडामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मनोहर दत्तात्रय सोनवणे (54) रा. जळगाव व जिब्राण शेख हे होंडा सिटी कार क्र. एम. एच. 15/ एफ. एफ. 7860 ही घेऊन पुणेच्या दिशेने जात असताना नांदूरशिंगोटे बायपासवर आल्यानंतर कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला.
काही करण्याच्या आताच संपूर्ण कारला आग लागल्याने सोनावणे व शेख यांनी तात्काळ कार रस्त्याच्या कडेला घेत कारमधून पळ काढला.
बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार पूर्णतः जळून खाक झाली. नांदूरशिंगोटे दूरपरिक्षेत्रच्या पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
या घटनेमुळे कारचालकाचे सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अधिक तपास आर. टी. तांदळकर करत आहेत.