लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
दोन फायनान्स कंपन्यांचे कर्ज बुडवण्यासाठी स्वतःची कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार देणार्या तरुणाचा डाव लासलगाव पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणला. ही कार नाशिक येथील स्क्रॅप बाजारातून जप्त करण्यात आली असून संबंधित फिर्यादीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी ऋषीकेश शांताराम क्षीरसागर (रा.शिवडी) यांनी मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार (एम.एच.१५ डी.एच.६०५६) चोरीला गेल्याची तक्रार २० जानेवारी २०२६ रोजी लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. विंचूर ते थेटाळे रोडवरून वनीकरण परिसरातून जात असताना कार अचानक बंद पडल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी करून घरी गेल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी कार चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळासाहेब कांदळकर करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, हे वाहन २७ डिसेंबर २०२५ रोजी पिंपळगाव बसवंत येथून नाशिकच्या दिशेने नेण्यात आले होते. त्यानुसार पिंपळगाव येथील टोलनायावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित कार नाशिककडे गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी नाशिक येथील स्क्रॅप बाजारात चौकशी केली असता फिर्यादी ऋषीकेश क्षीरसागर याने त्याची सेलेरिओ कार २७ डिसेंबर २०२५ रोजी नाशिकमधील एका स्क्रॅप कार खरेदी-विक्रेत्यास ५२ हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. ही कार स्क्रॅप विक्रेत्याकडून तत्काळ जप्त करण्यात आली.
पोलीस ठाण्यात बोलावून उलट चौकशी केली असता प्रथम फिर्यादीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाया दाखवताच त्याने कबुली दिली की, या कारवर दोन फायनान्स कंपन्यांचे कर्ज होते. कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्यानंतर फायनान्स कंपन्यांकडून कर्जाचे हप्ते माफ होतील. तसेच, कार स्क्रॅप करून पैसे मिळतील, या उद्देशानेच त्याने हा बनाव रचला होता. खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाल्याने ऋषीकेश क्षीरसागर याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे, पोलीस हवालदार बाळासाहेब कांदळकर, संदीप निचळ, पोलीस नाईक संदीप धुमाळ, पोलीस शिपाई सागर आरोटे, अविनाश सांगळे व अवधूत होंडे आदींनी परिश्रम घेतले.
वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतांना पोलीस प्रशासन यासाठी तपासाचा वेग वाढवून प्रयत्न करत आहे. परंतू विंचूर-थेटाळे मार्गावर चारचाकी वाहनाच्या चोरीची घटना घडल्यानंतर लासलगाव पोलीस प्रशासनाने या चोरीच्या घटनेची उकल होण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लावली आणि सत्य बाहेर आले. त्यात फिर्यादीच वाहनचोरीचा चोर निघाल्याने या घटनेला नवे वळण लागले आहे.
किरण आवारे, शिरवाडे वाकद





