Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रगायकवाड, डॉ. बोंडे यांना अटक करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

गायकवाड, डॉ. बोंडे यांना अटक करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

काँग्रेस नेते (Congress Leader) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात हिंसक भाषा करणारे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांच्याकडे केली. यावेळी राज्यपालांनी वादग्रस्त विधानांबाबत गृह खात्याकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासन काँगेस शिष्टमंडळाला दिले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जाऊन राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, राज्यात निर्माण झालेले राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, या नुकसानभरपाईपोटी मदत न मिळाल्याने  शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली प्रचंड अस्वस्थता या मुद्द्यांवर राज्यपाल  राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले.

हे देखील वाचा : Assembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११ उमेदवारांची घोषणा

या भेटीत शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेल्या विधानांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र हा  सहिष्णुतेच्या राजकारणासाठी ओळखला जातो. असे असताना आमचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक विधाने करण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास बक्षीस देण्याची तर खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची अश्लाघ्य विधाने केली. लोकशाहीत विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण विरोध करताना जीवाला धोका निर्माण करणे, हिंसेला प्रवृत्त करण्याची भाषा लोकप्रतिनिधींनी वापरणे हे कायद्याला धरून नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाले. पण आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या दोन्ही लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.

मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरे करून मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषी मंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत इतका दूजाभाव का? असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला.

हे देखील वाचा : Senate Election : ‘मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या’; उच्च न्यायालयाचे निर्देश

तसेच राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठयाप्रमाणावर वाढ झाली असून अल्पवयीन, शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या बदलापूर आणि नागपूर येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. स्पर्धा परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांना सरकारकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. युवा पिढी बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने  राज्यपालांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा  वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, विशाल पाटील, आमदार नितीन राऊत, अस्लम शेख, अमीन पटेल, विश्वजित कदम, विक्रम सावंत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या