शिरवाडे वाकद | प्रतिनिधी
देवगाव ता.निफाड येथील माहेर व भरवस येथील सासर असलेल्या विवाहितेचा मृतदेह विहीरीत आढळला आहे. वैष्णवी किरण वावधाने (24) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून सासरच्या मंडळींविरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत वैष्णवी यांचे वडील भारत रामनाथ बोचरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मोठी मुलगी वैष्णवी हिचे लग्न दिनांक 8 मे 2020 रोजी भरवस मानोरी शिवार येथील प्रभाकर गणपत वावधाने यांचा मुलगा किरण प्रभाकर वावधाने यांच्याशी झाले. त्यांना दोन वर्षाचा ईश्वर हा मुलगा आहे. मुलगी वैष्णवीचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीस तीन महिने तिला सासरच्या मंडळींनी व्यवस्थित वागवले. त्यानंतर तिचे सासरकडील लोकांनी तिने लग्नात काही भांडी आणले नाही , स्वयंपाक येत नाही, घरकाम येत नाही यावरून छळ केला. तसेच तिच्या नवर्याने तिला मारहाण केली वेळोवेळी शारीरिक मानसिक छळकेला. त्यामुळे तिने सासरच्या त्रासास कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असे म्हटले आहे.
पती किरण वावधाने, सासू जनाबाई प्रभाकर वावधाने, सासरा प्रभाकर गणपत वावधाने, दिर सुनील प्रभाकर वावधाने, जाव प्रतीक्षा सुनील वावधाने सर्व रा. मानोरी यांनी संगनमताने मुलगी वैष्णवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद दिली आहे. यावरून संबंधित आरोपींविरोधात 498 -306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.