नवी दिल्ली | New Delhi
काल (मंगळवारी) देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत (Delhi) जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर आज (बुधवारी) पुन्हा एकदा काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारांसह जंतरमंतरवर आक्रमकपणे आंदोलन केले. त्यामुळे दिल्ली पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर हे सर्व खासदार तीन बस भरून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानाकडे निघाले. परंतु या मैदानापासून १०० मीटर अंतरावरच पोलिसांनी बसेससह त्यांना अडवले. यानंतर राहुल गांधींनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. यावेळी त्यांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच व्होटचोर व्होटचोर ज्ञानेश कुमार अशा घोषणा दिल्या. या विरोधकांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण परिसर दणाणू सोडला होता.
दरम्यान, अनेक वेळ हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर अखेर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे रस्त्यावर ठिय्या दिलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही धोक्यात आणली असून, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा दिला.
कालही केले होते ठिय्या आंदोलन
मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांनी अडवले. त्यानंतर राहुल गांधी यांनी तब्बल आठ तास आकाशवाणी भवनवर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्रीच्या वेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
खासदारांवर करडी नजर
विरोधी पक्षांच्या खासदारांनी काल (मंगळवारी) आंदोलन केल्यानंतर दिल्ली पोलीस खासदारांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. आज विरोधक जंतरमंतरला धडक देण्याचे संकेत मिळताच पोलिसांनी आधीपासूनच तयारी केली होती. त्यातच जंतरमंतर परिसरात खासदारांच्या बसेस पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी बसमधून उतरून खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.




