Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याहिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा- अजित पवार यांची मागणी

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा- अजित पवार यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नागपूर ( Nagpur )येथे होणा-या हिवाळी अधिवेशनात (winter session)विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी हे आमच्या चर्चेचे विषय राहणार आहेत. मात्र, सरकारने अधिवेशनाचा जो दोन आठवडयांचा कालावधी प्रस्तावित केला आहे तो आम्हाला मान्य नाही. हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे चालले पाहिजे, अशी आमची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी केली. संसदीय कामकाज समितीच्या ५ डिसेंबर रोजी होणा-या बैठकीत हा विषय आम्ही लावून धरणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

- Advertisement -

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन येथे आज विरोधी पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार,बाळासाहेब थोरात,छगन भुजबळ, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे,एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी हे विषय आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. विदर्भाचे अनेक प्रश्न आहेत, ते या अधिवेशनात सोडविले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी सर्व विरोधकांची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावर, या वाचाळवीरांना आवरण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊशकत नाही. यांना तारतम्य तरी उरले आहे का? एकाला ठेच लागली की दुसरा सुधारत असतो. पण यांच्यात तर चढाओढच लागली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता हेच चुकीचे आहे. ‘या’ उदाहरणाची आणि ‘त्या’ उदाहरणाची तुलनाच होऊ शकत नाही. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असे कसे चालेल. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना अजित पवार म्हणाले, बैठकीत संघटनात्मक चर्चा आणि नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची सूचना शरद पवार यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

येत्या ६ डिसेंबर रोजी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीमध्ये शेतकरी दिंडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या