Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखपोरांच्या समयोचित सत्कृत्याचे थोरांनीही अनुकरण करावे!

पोरांच्या समयोचित सत्कृत्याचे थोरांनीही अनुकरण करावे!

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी देशभरात करोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. लसीकरणास मुलांचा (अर्थातच त्यांच्या पालकांचाही) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी देशातील ४१ लाख मुलांनी लस टोचून घेतली. त्यात महाराष्ट्रातील सुमारे पावणेदोन लाख मुलांचा समावेश आहे. पंधरा ते अठरा या वयोगटात देशातील साडेसात कोटी मुले लसीकरणास पात्र असल्याचे सांगितले जाते. एकाच दिवसातील या लसीकरणाची आणि अमेरीकेतील एकाच दिवसाच्या लसीकरणाची तुलना केली जात आहे. ४१ लाख मुलांना लसीकरण करण्यास अमेरिकेत ३३ दिवस लागले असते असेही सांगितले जाते. तथापि भारतातील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, लोकसंख्या आणि लसीकरणाविषयीचे समज-गैरसमज या पार्श्वभूमीवर भारतात लसीकरण मोहीम चालवताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकाच दिवसात ४१ लाख हा आकडा पार करणे हीच मुळात एक उपलब्धी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर मुलांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मुलांमध्ये लस टोचून घेण्याची उत्सुकता होती. काही केंद्रांवर तर माझा नंबर होता, तो मला ढकलून पुढे गेला अशा तक्रारीही मुलांनी केल्या अशा बातम्या माधम्यांत झळकल्या आहेत. यावरून लस टोचून घेण्यास मुले किती उत्सुक आहेत हे सिद्ध होते. करोना संसर्ग आणि मुले यासंदर्भात त्यांचे पालकही किती जागरूक होते हे यावरून लक्षात येते. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याआधी सरकारने पालकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही पालकांनी मुलांच्या लसीकरणाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. आता हाही अडसर दूर होत आहे. मुलांना लस टोचून घेण्याबाबत त्यांचे पालक सजग आहेत. त्याचबरोबर सामाजिक निर्बंध पाळून ते मुलांसमोर कृतीयुक्त आदर्श उभा करतील अशी आशा वाटते. लसींचे दोनही डोस टोचून घेणे, तोंडाला मुसके बांधणे, अनावश्यक गर्दी टाळणे, अकारण घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे आणि लक्षणे दिसल्यास तातडीने निदान करून घेणे हाच ओमायक्रॉनचा देखील संसर्ग टाळण्याचा सध्याचा तरी एकमेव उपाय आहे असे तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. पण ते किती जण मनावर घेतात? सामाजिक परिस्थिती तज्ज्ञांनी निराश व्हावे अशीच आहे. बहुसंख्य लोक तोंडाला मुसके न बांधता फिरतात. सार्वजनिक आणि राजकीय समारंभांना तर ऊत आला आहे. याबाबतीत ते राष्ट्रीय नेत्यांचा आदर्श गिरवत असतील का? निर्बंध पाळण्याचे आवाहन करणारे नेतेही अशा वेळी गर्दीचाच एक भाग होतात याचा अनुभव लोक सध्या घेत आहेत. देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. हळूहळू निर्बंध अधिकाधिक कडक होतील अशीच चिन्हे आहेत. अनेक महानगरांमधील सध्याच्या करोना रुग्णांपैकी ७५ टक्के तरी रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. भारतात स्पष्टपणे करोनाची तिसरी लाट आली आहे असे केंद्राच्या करोना विशेष कृती दलाचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी माध्यमांना सांगितले. या पार्श्वभूमीवर मोठ्यांच्या लसीकरण मोहिमेला देखील वेग यायला हवा. राज्यातील साधारणत: अद्याप एक कोटी लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही आणि जवळपास 82 लाख लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचे सांगितले जाते. लोकांनी लस टोचून घ्यावी म्हणून सरकारने विविध उपाय योजले आहेत. दवंडी पिटली जात आहे. वासुदेव, कीर्तनकार आणि प्रवचनकार लसीकरणाचे महत्व लोकांना पटवून देत आहेत. फोनची रिंग वाजल्यावर फोन उचलताच कानी कपाळी करोनाचे भजन ऐकवले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या