Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम

आंदोलकांना मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह प्रलंबित विविध १८ मागण्यांवर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कोणासाठी तोडगा न निघाल्याने गुरुवारी संपाचा तिढा कायम होता. अशातच आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी संप सुरूच ठेव्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका रुग्णसेवा तसेच इतर शासकीय कामांना बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र बैठकीचे इतिवृत्त अद्यापपर्यंत कर्मचारी संघटनांना देण्यात आलेले नाही. परिणामी सुधारित पेन्शन योजनेबाबतही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनच मागण्यांबाबत योग्य भूमिका जाहीर करण्यात यावी, अशी भूमिका कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आली आहे.

२२ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीला मुख्य सचिवांकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या १८ प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्यानंतरही कोणताही ठोस निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे या बैठकीचे इतिवृत्तही संघटनांना देण्यात आले नाही. सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबतही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यास्तरावर अधिकृत बैठक झाल्याशिवाय ठोस निर्णय होऊ शकणार नाही का, असा सवाल कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला आहे.

मागील १५ महिने लक्षवेधी आंदोलन करून शासनाकडून विनम्रपणे योग्य निर्णयाची अपेक्षा केली. परंतु सरकारने आजपर्यंत दुजाभाव दाखवला. कर्मचाऱ्यांचा संप आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून शिक्षकही मोठ्या प्रमाणात संपात उतरले असल्याचा दावा कमर्चारी संघटनेकडून करण्यात आला आहे. मागील तीन दिवस संप आंदोलनाद्वारे न्यायाची अपेक्षा करीत असताना सरकारकडून योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याने उद्या, शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय समन्वय समितीच्या सुकाणू समितीने घेतला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : जनगणना प्रात्यक्षिकानिमित्त दिंडोरीत कर्मचारी घरोघरी

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori जनगणनेचे प्रात्यक्षिक (Census Demonstration) करण्यासाठी कर्मचारी दिंडोरी शहरातील घरोघरी जात असून प्रात्यक्षिकांमुळे दिंडोरी शहरात (Didnori City) सुध्दा जनगणनेविषयी औत्सुक्य...