Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याधगधगत्या मशालीने जागवला नाशिककरांचा इतिहास

धगधगत्या मशालीने जागवला नाशिककरांचा इतिहास

नाशिक । विजय गिते Nashik

शिवसेनेत ( Shivsena )उभी फूट पडल्यानंतर घरोघरी मतदारांपर्यंत पोहचलेले धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धगधगती मशाल हे नवीन चिन्ह मिळाले आहे.त्यामुळे हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाच्या खांद्यावर येऊन पडली आहे. असे असले तरी नाशिकच्या शिवसैनिकांना हे नवीन नाही. कारण नाशिकमध्ये 37 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना धगधगती मशाल हे चिन्ह घेऊनच रणांगणात उतरत ही लढाई लढली होती.

- Advertisement -

राजकारणाच्या ज्वाळांनी होरपळून निघालेल्या नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे वीर हे जनसेवेचा विधायक गारवा आणतील असा दावा तेव्हा शिवसैनिकांकडून करण्यात येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तसा शब्दच देण्यात आला होता,असे त्यावेळचे कडवट शिवसैनिक आजही त्याच त्वेषेने सांगतात.काळाच्या ओघात आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना या नावाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल तर शिंदे गटाला ’ढाल-तलवार’ अशी निवडणूक चिन्हे बहाल करण्यात आली आहेत. दोन्ही गटांसाठी ही चिन्हे नवीन असली तरी 37 वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना ’धगधगती मशाल’ हे चिन्ह घेऊन रिंगणात उतरल्याचे जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी सांगितलं.

त्यावेळच्या निवडणुकीतील एक पत्रकही हाती आले आहे. त्यात नाशिक विधानसभेसाठी तत्कालीन जिल्हाप्रमुख केशवराव थोरात, बबनराव घोलप (देवळाली), उत्तम भालेराव (चांदवड), सोमा कामडी ( इगतपुरी), किशोर सोनवणे (येवला), अशोक रसाळ (नांदगाव) यांनी उमेदवारी केली होती. यासह कोकणातील रत्नागिरी व खेड मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवारांचे देखील ’धगधगती मशाल’ हेच चिन्ह होते.तत्कालीन निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही. मात्र त्यानंतरच्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपला दबदबा वाढविला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे 1985 साली शिवसेनेकडून मुंबईत नगरसेवक पदासाठी उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.त्यानंतर 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ हे शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते.

1985 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी चिन्ह होते धगधगती मशाल या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला.

1984 साली इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडीक या दोन उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष नसल्याने तेव्हा शिवसेनेच्या उमेदवारांना कमळ धरावे लागले होते. पण 1984 च्या त्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले.भाजपचे तर देशभरातून फक्त दोनच खासदार निवडून आले होते.नंतर लगेच काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेचे चिन्ह धगधगती मशाल हेच होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या