Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरी : औद्योगिक वसाहत करोनाग्रस्त

दिंडोरी : औद्योगिक वसाहत करोनाग्रस्त

लखमापूर । Lakhmapur वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात करोनाने रौद्र रूप दाखविल्यामुळे दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहे. लखमापूर औद्योगिक वसाहतीतील हेक्सागॉन केमिकल कारखान्यात एक, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज कंपनीमध्ये सहा तर अवनखेड येथील पॉलीझिन्टा कंपनीत 3 रुग्ण आढळल्याने लखमापूर परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कामगार नाशिक येथून कंपनीत कामाला येत होते. आरोग्य विभागाकडून कारखान्यांना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहे, असे वैद्यकिय अधिकारी डॉ.कोशिरे यांनी सांगितले.

दरम्यान, दिंडोरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक काळ करोना मुक्तीसाठी आघाडीवर असणारा दिंडोरी तालुका आता करोनाने व्यापला आहे. संपूर्ण जिल्ह्यात करोनामुक्त म्हणून दिंडोरी तालुक्याला ओळखले जात होते, परंतु आता मात्र जिल्ह्यात रुग्णांबरोबर मृत्यू आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे. करोनाची समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे.

करोनाचा बंदोबस्त करण्यासाठी दिंडोरी तालुक्याने सर्वप्रथम आठवडे बाजार बंद करणारा पहिला दिंडोरी तालुका होता. या तालुक्यात कडक उपाययोजना सर्व ठिकाणी केल्या होत्या. शासनाने दिलेले लॉकडाऊनचे नियम तालुक्याने काटेकोरपणे पाळूनसुद्धा आता करोनाबाबत या तालुक्याचे नाव जिल्ह्यात अग्रेसर होत असल्यामुळे प्रशासन व तालुक्यातील नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली आहे.

अगोदरच्या काळात गावात जर एखादा रुग्ण सापडला तर ते गाव लॉकडाऊनच्या नावाखाली सील केले जात होते, परंतु आता मात्र गावात चार ते पाच रुग्ण तसेच करोना रुग्णाचा मृत्यू होऊनही गाव लॉकडाऊनच्या नावाखाली सील होत नाही.

त्यामुळे ग्रामीण भागात करोनाने आपले बस्तान जास्त प्रमाणात बसविले आहे, असे तालुक्यातील नागरिकांमधून बोलले जात आहे. तालुक्यातील जनता शासनाने दिलेला लॉकडाऊन, सामाजिक अंतराचा वापर करीत नसल्यामुळे करोनाचा फैलाव जास्त प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या