मुंबई | प्रतिनिधी Mumbai
भिवंडी महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवली आणि पक्षाचे सर्वात जास्त ३० नगरसेवक निवडून झाले. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला आहे. परंतु, बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे. आता भाजपचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाल्याने भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
भाजपने भिवंडीत महापौर पदाची उमेदवारी स्नेहल पाटील यांना जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना घेऊन सेक्युलर फ्रंटची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना सपकाळ यांनी भिवंडी महापालिकेत सेक्युलर फ्रंटची सत्ता येईल, असा दावा केला.
भाजपचा त्याग करुन सेक्युलर फ्रंटसोबत येण्याचा निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. आज त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पक्षाने गेल्या २४ दिवसात इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली. या चर्चेनंतर कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सपकाळ म्हणाले.
भिवंडीत सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी समाजवादी पक्षाशी चर्चा केली होती. पण त्यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भाजप सोडून काही नगरसेवक आमच्या आघाडीत सहभागी झाल्याने आमचा सत्ता स्थानपनेचा मार्ग मोकळा झाल्याचे खासदार म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.





