Monday, July 1, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथे कारमध्ये झालेला ‘त्या’ व्यावसायीकाचा खून अवैध दारु तस्करीच्या वादातून

नवापूर येथे कारमध्ये झालेला ‘त्या’ व्यावसायीकाचा खून अवैध दारु तस्करीच्या वादातून

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

- Advertisement -

सुरत येथील ‘त्या’ व्यावसायीकाचा खून अवैध दारु तस्करीच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी सुरतच्या दोन सुपारी किलरांना अटक करण्यात आली आहे. नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून त्यांच्या साथीदारांच्या शोधासाठी पथक गुजरातमध्ये रवाना करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१७ जुन रोजी नवापूर शहरातील बी.एस.एन.एल ऑफिसच्या पुढे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एका कारच्या मागच्या सीटवर एका इसमाच्या हातापायावर व तोंडावर धारधार शस्त्राने वार करुन तोंडावर प्लास्टिक चिकटपट्टी चिकटवून त्याला जिवेठार मारण्यात आले होते.

नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द् खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मयताच्या खिशात ऑनलाईन जेवणाची ऑर्डर दिल्याची पावती होती. त्या पावतीवर त्याचा मोबाईल नंबर होता. त्यावरुन मयताची ओळख पटविण्यात पथकाला यश आले होते. मयत हा भावेशभाई सी.मेहता रा.घनश्यामभाई सोसायटी, सुरत (गुजरात) असल्याचे समजून आल्याने मयताच्या घरी सदर घटनेबाबत कळवून मयताची खात्री करण्यासाठी त्यांना नवापूर येथे बोलविण्यात आले होते.

मयताच्या भावाने त्यास ओळखल्याने मयताची खात्री झाली. गुन्ह्याचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते, परंतु मयत सुरतहुन नवापूर येथे का आला व त्याचे मारेकरी कोण? हे प्रश्न पोलीसांपुढे होते,

म्हणून पोलीसांनी घटनेच्या आजुबाजुच्या परिसरात तसेच नवापूर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही.फुटेज तपासले. त्यात दि.१६ जून रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर ५ ते ६ इसम हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले.

तसेच दि.१७ जून रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल उर्वशी येथे देखील ते ५ ते ६ संशयीत आरोपी दिसून आल्याने आरोपी निश्चीत झाले. मयत हा सुरत येथील असल्याने व मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एक पथक तात्काळ सुरत येथे रवाना केले.

नंदुरबार पोलीस पथकाने अथक परिश्रम घेत सलग ३ दिवस मेहनत घेवुन सुरतसारख्या शहरात बातमीदार तयार करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेले संशयीत हे सुरत, नवसारी येथे दारुची अवैध तस्करी करणारे व पैसे घेवून गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळवली.

त्यावरुन आरोपीतांचा शोध घेण्यात येत होता. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार पोलीसांचे अजून एक पथक तयार करुन गुजरात राज्यातील नवसारी येथे रवाना केले. सुरत येथील पथकाने अथक परिश्रम घेत सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेला एक आरोपीचे घर शोधून काढले.

पथकाने संशयीत आरोपीच्या घराच्या आजुबाजुला सलग ४ दिवस वेशांतर करुन पाळत ठेवून दि.१९ जून रोजी एक संशयीत इसम आकाश रमेशभाई जोरेवार (रा.आंबेडकर नगर, सुरत) यास शहर गुन्हे शाखेच्या मदतीने शिताफीने बेड्या ठोकल्या.

त्यास खूनाबाबत अधिक विचारले असता त्याने त्याचे इतर साथीदारांची नावे सांगीतली. त्यास मयताला मारण्याचा हेतूबाबत विचारले असता त्याने सांगितले की, अवैध दारु तस्करीच्या व्यावसायातील वादातून खून केला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला असता दि.२३ जून रोजी गुन्ह्यातील अजून एक संशयीत आरोपी आकाश अरविंदभाई ओड (रा.अंबिका नगर, सुरत) यास ताब्यात घेण्यात पथकास यश आले.

आरोपीतास नंदुरबार येथे आणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: विचारपुस केली. आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली देवुन खुन का केला याबाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. उर्वरीत आरोपीतांचा कसून शोध सुरु आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहा.पोलीस निरीक्षक धिरज महाजन, संदीप पाटील,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकुर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या