Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा बँकेचा अध्यक्ष आज ठरणार

जिल्हा बँकेचा अध्यक्ष आज ठरणार

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्हा बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी आज संचालक मंडळाची बैठक बोलावली असून यात बँकेच्या 49 व्या पदाधिकार्‍यांची

- Advertisement -

निवड होणार आहे. दरम्यान, चेअरमन, व्हाईस चेअरमन पदावर कोणाची निवड करायची याबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी नगरमध्ये महसूल मंत्री थोरात, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख आणि राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे हे चर्चा करून निर्णय घेणार आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँकेवर थोरात आणि राष्ट्रवादीच्या शेतकरी मंडळाची एक हाती सत्ता आली आहे. आता बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड होणे बाकी दुपारी 12 पर्यंत बँकेचा नवा अध्यक्ष कोण याचे चित्र स्पष्ट होणार आहे. आज दुपारी एक वाजता निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चेअरमनपदासाठी आधी थोरात गटाकडून ज्येष्ठ नेते माधवराव कानवडे यांचे नाव चर्चेत होते. तर राष्ट्रवादीकडून माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, राहुल जगताप आणि महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे नाव चर्चे होते. मात्र, यात आ. जगताप हे विधान परिषदेसाठी ही इच्छुक असल्याची चर्चा असून शेळके हे सध्या महानगर बँकेचे चेअरमन आहे. तर राहुल जगताप हे पहिल्यांदा बँकेवर निवडून आलेले असल्याने राष्ट्रवादीकडून चेअरमन पदासाठी कोणाच्या नावावर शिक्का मारण्यात येणार याबाबत तर्कविर्तक लावण्यात येत आहे.

दुसर्‍या शक्यतेत बँकेचे चेअरमन पद थोरात गटाकडे जाण्याचा अंदाज जाणकारांचा आहे. गतपंचवार्षिकला हे पद राष्ट्रवादीकडे होते. यामुळे थोरात गटाच्या वाट्याला चेअरमन पद देवून राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा अंदाज आहे. यातही उपाध्यक्षपदासाठी ऐनवेळी पारनेरकरांचे नाव समोर येण्याची शक्यता नाकारात येत नाही. यामुळे आज सकाळी होणार्‍या थोरात-गडाख आणि तनपुरे यांच्या बैठकीला महत्व आले असून यात सर्व शक्यता पडताळून बँकेचा पुढील चेअरमन ठरण्याची शक्यता आहे.

…………….

दबाव तंत्र कोणाचा यशस्वी ठरणार

जिल्हा बँकेच्या राजकारणात आतापर्यंत दबाव तंत्राचा वापर झालेला आहे. बँकेत चेअरमन पदासाठी जिल्ह्यातील नेत्यांचा दबाव तंत्राचा फॉम्यूला जूनाच आहे. ऐनवेळी लॉबी करून मला नाही, तर तुला नाही, या समिकरणाचा वापर करून तिसरच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ पडलेली आहे. यामुळेच जिल्हा बँकेचे राजकारण वेळ असल्याचे सिध्द झालेले आहे.

………………..

नव्या जुन्यांचा मेळ घालण्याचे आवाहन

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात नेत्यांना नव्या आणि जुन्या चेहर्‍यांचा मेळ घालण्याचे आवाहन आहे. या संचालक मंडळात सहकारातील अनुभव व्यक्तीसोबत जिल्ह्याच्या आणि बँकेच्या राजकारणात नव्याने प्रवेश केलेले संचालक आहे. बँकेच्या पुढील वाटचालीसाठी या सर्वांना एका दोरीत बांधण्यासोबत त्यांच्या मेळ घालण्याचे काम जिल्ह्यातील नेत्यांना करावे लागणार आहे.

……………..

पवार-थोरातच किंगमेकर

राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बँकेच्या निवडणुकीची सुत्रे हाती घेवून बँकेवर एक हाती सत्ता मिळवली. आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ठरविताना पवार आणि थोरात हेच किंगमेकर ठरणार आहेत. यांच्या निर्णयानूसारच बँकेचा पुढील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ठरणार आहे.

………………

- Advertisment -

ताज्या बातम्या