Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसावळ्या गोंधळाचा पुढचा अध्याय!

सावळ्या गोंधळाचा पुढचा अध्याय!

शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा कुठवर सुरुच राहाणार या प्रश्नाने सर्वांना सतावले आहे. कालचा गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ यावी इतके नवनवे गोंधळ रोज उजेडात येत आहेत. उत्तरपत्रिका लिहिताना चूक झाली तर विद्यार्थ्यांचे गुण कापले जातात. पण धोरणे, अंमलबजावणी आणि निर्णयप्रकियेतील उणीवांचे काय? त्यातील धरसोडवृत्तीचे भीषण परिणाम सर्वच विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे व्यावसायिक भवितव्य पणाला लागत आहे आणि काहींच्या मात्र भव्यदिव्य कर्तबगारीची नवीनवी रुपे जनतेसमोर उघड होत आहेत. तुप अत्यंत गुणकारी खरे पण प्रमाणााबाहेर खाल्ले गेले तर अनेक व्याधी-उपाधी बेजार करतातच. अनेकांना सावली मिळते की नाही माहिती नाही, पण ‘डेरेदार’ वृक्ष मात्र बहरतात. असेच बरेचसे या आठवडाभरात घडले आहे. गतवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अडीचशे पेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या साधारणत: चार हजारांपेक्षा जास्त परीक्षा ऑनलाईन घेतल्या होत्या. सहा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्याचे सांगितले जाते. या परीक्षांचे निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर झाले. तथापि विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळाल्या नसल्याचे वृत्त माध्यमात झळकले आहे. काय हेतूने ते छोटेसे काम खोळंबले आहे? निकाल लागून चार महिने उलटले आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. पण गुणपत्रिकाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची ऑनलाईन उपलब्ध असलेली प्रत जोडली आहे. तथापि प्रवेशाच्या वेळी कागदपत्रांची पुर्नतपासणी करतांना मुळ गुणपत्रिका द्यावीच लागते अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. विद्यार्थी रोज गुणपत्रिकांसाठी गर्दी करत आहेत पण त्या उपलब्ध नसल्याने सर्वांचीच अडचण होत असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयीन अध्यापक वर्ग व्यक्त करतात. विद्यार्थ्यांमागचे अनिश्चिततेचे शुक्लकाष्ट कधी संपणार? दीड वर्षे शाळा आणि महाविद्यालये बंद होती. नंतर कधीतरी तरी ती ऑनलाईन सुरु झाली. परीक्षाही ऑनलाईन झाल्या आणि त्याचे निकाल लागले. पण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांचा पार बोर्‍या वाजला. डिसेंबर महिना संपत आला तरी ती प्रक्रिया अजुन सुरुच आहे आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मात्र बेपत्ताच आहेत. रडतखडत एकदाच्या शाळा आणि महाविद्यालये सुरु झाली. पण एसटी बसचा संप असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे अवघड झाले. या अडचणींवर मात करुन काही विद्यार्थी शाळेत पोहोचले खरे पण शाळेत कोणताही अभ्यास न होता थेट परीक्षांना सामोरे जायची वेळ विद्यार्थ्यांवर आली. विद्यार्थ्यांनी परीक्षा तरी किती द्यायच्या? विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळण्याची काय कारणे असावीत? याविषयी विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे तर्क व्यक्त होत आहेत. गुणपत्रिका छपाईच्या निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याचे सांगितले जाते. तर करोना काळात स्टेशनरी येण्यास विलंब झाल्याचा खुलासा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी माध्यमांकडे केला आहे. करोनाचा सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. तथापि निर्बंध सैल होऊनही बराच काळ उलटला आहे. दैनंदिन व्यवहारही पुर्ववत सुरु झाले आहेत. तरी गुणपत्रिका कोणत्या सबबीखाली अडकवून ठेवल्या आहेत? शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची मुळ प्रत अत्यावश्यक असते ती अट तरी रद्द करुन टाका. अन्यथा विद्यापीठच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया घालवत आहे असे विद्यार्थ्यांनी समजावे का? पुणे विद्यापीठ हे जगातील एक नामांकित विद्यापीठ आहे असे सांगितले जाते. विद्यापीठाला 72 वर्षांचा इतिहास आहे. विद्यापीठांतर्गत लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. पण विलंबाचा आणि दिरंगाईचा विद्यापीठाच्या लौकीकावर विपरित परिणाम होतो याचा विसर संबंधितांना का पडला? अजून अशा कोणकोणत्या प्रक्रियांना विलंब होत असेल? त्यातील उणीवा शोधून त्यावर तातडीने उपाय शोधले जातील का? आपापल्या जबाबदारीचे पुरेसे भान शिक्षणक्षेत्रातील शिक्षक-अध्यापकांसारख्या वरिष्ठ सेवक वर्गाला तरी असावे ना? अशा अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थितीतून सुटका अजुन किती काळ लांबणार याचा मुहूर्त पालक व विद्यार्थी वर्गासाठी तरी कोणीतरी सांगेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या