अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोलीस कारवाई करत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या दालनासमोरच विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. रमेश नवल्या काळे (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काळे यांच्यावर सुरूवातीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पुढील उपचारकामी त्यांना पुणे येथे हलविले असल्याची माहिती समजते. दरम्यान, काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (तालुका पोलीस ठाणे कॅम्प हद्दीत येत असल्याने) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिवाजी माने यांनी फिर्याद दिली आहे. काळे यांचे देऊळगाव सिध्दी शिवारातील गायरान जमिनीच्या वादातून काही लोकांसोबत वाद झाले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपींना अटक करून मला न्याय द्यावा, अशी विनंती करण्यासाठी काळे हे पत्नी व मुलीसह सोमवारी सकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात आले होते.
तेथे त्यांचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, अंमलदार माने यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर काळे यांनी सोबत आणलेले विषारी पदार्थाचे सेवन करून सहायक निरीक्षक गिते यांच्या दालनासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला. विषारी पदार्थ पोटात गेल्याने बेशुध्द झालेल्या काळे यांना उपचारासाठी त्यांच्या मुलीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
काळे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयित चार आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. गायरान जमिनीतील अतिक्रमण काढून देण्याची त्यांची मागणी होती. परंतु ते काम पोलिसांचे नसल्याचे त्यांना वारंवार सांगितले. मात्र तरीही त्यांनी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
– एपीआय प्रल्हाद गिते (नगर तालुका पोलीस ठाणे)