Thursday, May 2, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव स्थगित

गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव स्थगित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाला होत असलेला विलंब व धरणातील खालावलेला जलसाठा पाहता नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याची वेळ आली आहे. त्यासाठी साधारणत: साडेपाच कोटी खर्च येणार होता. पण बजेटमध्येच या खर्चासाठी तरतूदच नसल्याने मान्यता देण्याचा मुद्दा उपस्थित करत महासभेने हा विषय तहकूब ठेवला आहे. सर्वात अगोदर पाण्याचे नियोजन राज्याला देऊन शाबासकी मिळवणार्‍या मनपा प्रशासनाने पाणी कपातीचे धाडस न दाखवल्याने नाशिककरांच्या घशाला कोरड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

- Advertisement -

तब्बल एक महिन्यानंतर बुधवारी (दि.21) प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा पार पडली. यावेळी चर खोदण्याच्या विषय तहकूब ठेवण्यात आला. अल निनोच्या संकटामुळे मान्सूनला उशीराने आगमन होईल हा अंदाज खरा ठरण्याची चिन्हे आहेत. जुलैमध्येही पाऊस न पडल्यास धरणाची पाणी पातळी सहाशे मीटरपेक्षा जास्त खाली जाईल तेव्हा पाणी जॅकवेलपर्यंत नेण्यासाठी धरणाच्या मध्य भागापर्यंत चर खोदणे आवश्यक होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने तयारीचा चारी खोदण्यासाठी निविदेच्या मागविण्याची तयारी केली होती. त्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मंजुरीसाठी हा विषय महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला. शहरावर पाणी कपातीचे संकट नको म्हणून त्यास मंजुरी दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण बजेटमध्ये या खर्चाबाबत तरतूद धरण्यात आली नव्हती. त्यामुळे अगोदर चर खोदण्यासाठी तरतूद करा नंतर हा मंजुरीसाठी महासभेवर प्रस्ताव ठेवा, असे सांगत हा विषय तहकूब ठेवण्यात आला.

माजी महापौरांची शिष्टाई

गंगापूर धरणात बांधलेले जॅकवेल त्यामधून नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याचापुरवठा थेट पाइपलाईन योजनेच्या माध्यमातून दिला जात असून ह्या धरणात जॅकवेल बांधलेले असून त्यासाठी पाणी येण्यासाठी चर खोलवर खोदलेली असून गेल्या चार वर्षांपूर्वी देखील अशीच चर खोदल्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव आखला गेला होता.

परंतु त्या वेळेस देखील मी महानगरपालिका आयुक्तांना खोदलेल्या चरचा फोटो पाठवून संबंधित बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर चर खोदाईचा विषय संपुष्टात आला होता. आता पुन्हा हा विषय पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा ठेकेदारांची टोळी सक्रिय झाल्याचे आढळून येते आहे, यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आपण प्रशासन प्रमुख आयुक्त म्हणून लक्ष घालावे.

तसेच आवश्यकता भासल्यास आपल्या नाशिक महापालिकेचे फोकलण्ड प्रणाली स्वतःची असून गरज भासल्यास त्याचा वापर गाळ काढण्यास करावा ही सूचना चार वर्षांपूर्वी मांडलेली असल्याचे माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे

बजेटमध्ये चर खोदण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने हा विषय महासभेने तहकूब ठेवला. याबाबत निधीची तरतूद करुन नव्याने हा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाईल.

-अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या