Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसामर्थ्याची शोधयात्रा!

सामर्थ्याची शोधयात्रा!

गोदाकाठी सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या देशदूतची खान्देश आवृत्ती आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या वळणावरुन मागे वळून पाहतांना आमच्या मनात कृतार्थतेचे भाव आहेत. गेल्या 24 वर्षांच्या प्रवासाचे सिंहावलोकन करण्याचा मोह आज आवरता येत नाहीये. या दोन तपांच्या कालावधीत देशदूतने समाजाचा विश्वास संपादन केला, देशदूतमध्ये छापून आलेली बातमी वास्तवतेला धरुनच असेल अशी खात्री वाचकांना वाटते, ही आमची कमाई आहे. 1780 साली सुरु झालेले द बंगाल गॅझेट, 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेले दर्पण, त्यानंतर अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. पत्रकारितेच्या या प्रवासात देशदूतची वाटचाल पत्रकारितेचा संपन्न वारसा आणि परंपरेत भरीव योगदान देणारी आहे. समाजात चांगले होते ते अधिकाधिक अधोरेखित करण्याचे काम देशदूतने केले आहे. केवळ वाईटावर प्रहार करुन आम्ही थांबत नाही तर त्या प्रवृत्तीचा बिमोड व्हावा असाच आमचा प्रयत्न असतो. वाईटावर प्रहार करतांना संबधित घटक आयुष्यातून उद्ध्वस्त व्हायला नको हे पथ्य देशदूतने नेहमीच पाळले. खान्देशातील चालीरिती, सांस्कृतिक जडणघडण अधिकाधिक समृध्द कशी होईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नरत राहिलो आहोत. उद्योगधंदे, व्यवसाय वाढीसाठी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. केवळ चकचकीत रस्ते, गगनचुंबी इमारती, व्यावसायिक भरभराटी म्हणजेच जिल्ह्याचा विकास नसतो. त्या शहरात, जिल्ह्यात सांस्कृतिक उपलब्धी काय आहे? कोणते नवे प्रयोग होत आहेत? यावरदेखील शहराची श्रीमंती मोजली जाते. या संपन्नतेसाठी देखील देशदूत नेहमीच अग्रभागी राहिला आहे. शेती हाच खान्देशच्या चलनवलनाचा मुख्य स्त्रोत आहे. शेतकर्‍यांच्या समस्या काय? नवे प्रयोग कोणते? नवे संशोधन काय होते आहे? या बाबत आपल्या काश्तकारांचे प्रबोधन होण्यासाठी देशदूत नेहमीच माध्यम राहिला आहे. सामान्य माणूस हा नेहमीच देशदूतसाठी केंद्रबिंदू आहे. सामान्यांचे जीवन किमान सुखकर व्हावे, त्यांना किमान मुलभूत सोईसुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी देशदूत नेहमीच जागल्याची भूमिका निभावत आला आहे.

आमच्या डोक्यावर ना कुणाची टोपी ना कुणाचा रंग या ब्रिदवाक्याला अनुसरुन देशदूतची वाटचाल आहे. कोणताही राजकारणी आमचा शत्रू नाही आणि कोणाच्याही प्रभावात आम्ही नाही. आपल्या परिसराच्या विकासासाठी राजकीय नेतृत्वाने एक होऊन पाठपुरावा करावा यासाठी दबाव गट म्हणून देशदूत नेहमीच सक्रीय राहिला. ज्या भागाचे राजकीय नेतृत्व खंबीर, जनतेच्याप्रती उत्तरदायी असते त्या परिसराचा विकास जलद गतीने होतो, हा साधा सिध्दांत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींमध्येही टोकाचे मतभेद असतात मात्र विकासाच्या मुद्यावर सारे एक होतात. ही मानसिकता आता आपल्याकडे रुजली असली तरी बहरलेली नाही. आपली बरीचशी नेतेमंडळी स्वतःच्या कोशातून बाहेर यायला तयार नाहीत. आपली नेते मंडळी स्वतःच्या राजकारणातून बाहेर येऊन सामूहिकपणे विकासपथावर आगेकूच करतील तो सुदिन म्हणावा! यासाठी देशदूतचा पाठपुरावा सुरुच राहील.

- Advertisement -

सकारात्मक पत्रकारितेचा पुरस्कार करतांना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक देशदूत करतो. यासाठी विविध अभियान देशदूतने राबविले आहेत. संपादक तुमच्या भेटीला या अभियानाद्वारे देशदूतचे तत्कालीन संपादक स्व.सुभाष सोनवणे यांनी वर्षभर शहर पिंजून काढत सामान्य माणसाच्या व्यथा, वेदनांना आवाज दिला. जळगावकरांनी या अभियानाला डोक्यावर घेतले होते. उद्योजकांच्या भेटीला संपादक या अभियानातून देशदूतने जळगावची संपन्न औद्योगिक वसाहत प्रकाशझोतात आणली. आपल्या एमआयडीसीत काहीच नाही असे म्हणणार्‍यांना हे अभियान म्हणजे चपराकच होती. आताही रौप्य महोत्सवात पदार्पण करीत असतांना देशदूतने शोध सामर्थ्याचा हे महाअभियान हाती घेतले आहे. चार मित्र एकत्र आले तरी गप्पांमध्ये नकारात्मक विषयांचीच उजळणी होते. रस्ते नाही, पुरेसे पाणी नाही, स्वच्छता नाही, एकूणच विकास नाही अशा पध्दतीची चर्चा रंगते. अर्थात या चर्चेतील मुद्दे अर्थहिन नाहीत. मात्र या समस्या काही आजच सुटणार्‍या नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबते आहे. काही बाबी नकारात्मक असल्या तरी अनेक बाबी अशा आहेत की त्यातून ऊर्जा मिळू शकते. आपला खान्देश चांगल्या माणसांची खाण आहे. क्षेत्र कोणतेही घ्या, त्यात चौकटीतून बाहेर जाऊन कार्यमग्न असणारी मंडळी आहे आणि हेच आपले सामर्थ्यही आहे. अशाच सामर्थ्यवान गुणवंतांची नव्याने ओळख आम्ही करुन देणार आहोत. सामर्थ्याची ही शोधयात्रा वर्षभर सुरु राहणार आहे.

डिजिटल हा नव्या युगाचा मंत्र आहे. तरुणाईला जवळचे वाटणारे हे माध्यम आहे. डिजिटलचा बोलबाला आता वाढला आहे मात्र देशदूतने दोन दशकांपुर्वीच भविष्याच्या वाटा ओळखत डिजिटल क्रांती आत्मसात केली. वेळोवेळी होणारे बदल स्विकारत आज देशदूतचा डिजिटल विभाग सक्षमपणे साकारला हे ठळकपणे नमूद करावेसे वाटते. देशदूतच्या 24 वर्षांच्या प्रवासात खान्देशातील वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते बांधव यांनी देशदूतला दिलेली साथ मोलाची आहे. ही आभाळमाया कायम राहील, ही खात्री आहे.

– हेमंत अलोने, संपादक

- Advertisment -

ताज्या बातम्या