जळगाव । jalgaon
जेवणाचे पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या 9 वर्षीय भाच्याला वाळूच्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना बुधवार दि.२५ रोजी रात्री 7.15 वाजेच्या सुमारास कालंका माता चौकात घडली.
या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर पेटविला. यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने डंपरचालकाच्या अटकेची मागणी करीत मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान क्युआरटीच्या पथकाने जमावाला पांगविण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
याप्रसंगी भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांसह महामार्गावर ठिय्या मांडला होता. योजस धीरज बर्हाटे (वय-9 रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. योजस हा मुलगा आपले आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बर्हाटे (वय 13) यांच्यासोबत आयोध्या नगरातील लीलापार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी 25 डिसेंबर रोजी त्याचे भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. भक्ती हिचा वाढदिवस असल्याने बुधवारी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी 7.15 वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणार्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योजस बर्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. तर त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले.