Friday, May 3, 2024
Homeनाशिकसलग दुसर्‍या वर्षी सिन्नर तालुका बनला टँकर मुक्त

सलग दुसर्‍या वर्षी सिन्नर तालुका बनला टँकर मुक्त

सिन्नर । Sinnar

जिल्ह्यात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याचे टँकर लागणारा तालुका म्हणून शासन दरबारी वर्षानुवर्ष नावलौकिक मिळवलेला सिन्नर तालुका गेल्या दोन वर्षांपासून टँकरमुक्त बनला आहे.

- Advertisement -

‘युवा मित्र’, ‘टाटा ट्रस्ट’, ‘ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशन’ व ‘महाराष्ट्र शासन’ यांच्या सहकार्यातून गेल्या चार वर्षात राबवलेल्या ‘जलसमृद्धी’ अभियानामुळे ही किमया साधली आहे. या अभियानामुळे तालुक्यातील भूजल पातळीत वाढ झाली असून तालुक्यातील गावांसह वाड्या-वस्त्यांवरील विहिरींना भर उन्हाळ्यातही पाणी राहू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्याची वेळ कुणावरही येत नाही.

तालुका टँकर मुक्त बनल्याने त्यावर दरवर्षी होणार्‍या करोडो रुपयांच्या खर्चाचीही बचत झाली आहे.

तालुक्यात भोजापूर (330 दश लक्ष घनफूट) हे एकमेव मोठे धरण असून हे धरण वगळता कोनांबे, ठाणगाव, सरदवाडी या छोट्या धरणांसह 84 गावांमधील 182 पाझरतलाव, सिमेंट नाला बांध, छोट्या नाल्यांमधला 23 लाख 6 हजार क्युबीक मीटर गाळ शेतकर्‍यांना सोबत घेऊन संस्थेने नियोजनबद्ध रित्या काढण्यात यश मिळवले. त्यातून तालुक्याची पाणी साठवण क्षमता 81.43 दशलक्ष घनफुट अर्थात 2306 टी.सी. एम. ने वाढली.

या कामामुळे या सर्व गावांमधील जवळपास 3700 विहिरी चार्ज(पुर्नभरण) झाल्या तर काढलेला गाळ शेतकर्‍यांनी स्व:खर्चाने नेत 1719 एकर पडीक जमीन सुपीक बनवली.

या कामासाठी ‘टाटा ट्रस्ट’ने 6 पोकलॅन मशीन्स व 3 जे.सी. बी. मशिन्स ‘युवा मित्र’ ला उपलब्ध करुन दिली. ए.टी. ई. चंद्रा फाऊंडेशनने जवळपास 30 पोकलॅन मशिन्स भाड्याने घेण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला तर राज्य शासनाने या सर्व मशिन्सकरीता आवश्यक असणार्‍या डिझेलचा खर्च उचलला. त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांसह पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, मृद व जल संधारण (स्थानिक स्तर), कृषी विभागाच्या स्थानिक व जिल्हास्तरीय अधिकार्‍यांचे योगदान महत्वाचे ठरले.

काही उद्योगांनी आपला सी.एस.आर. फंडही त्यासाठी उपलब्ध करुन दिला. या कामामुळे कमी पाऊस पडूनही तालुक्याच्या भूजल पातळीत 1.5 मीटरने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष शासकीय यंत्रणेने दोन-अडीच वर्षांपूर्वी काढला होता.

सन 1972 च्या भीषण दुष्काळात गावा-गावातील शेतकर्‍यांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेचा उदय झाला. त्यातून राज्यातील पहिला पाझर तलाव दोडी येथे तयार झाला आणि त्यानंतर गावा-गावात पाझर तलावांची मालिकाच उभी राहिली. त्याच काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांनीही गावा-गावांमध्ये उभारलेले बंधारे ‘फादर’चे बंधारे म्हणून आपली ओळख आजही टिकवून आहेत.

या व्यतिरिक्त गेल्या 40-45 वर्षात गावा-गावांमध्ये कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट प्लग बंधारे मोठ्या संख्येने उभारले गेले. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुठलीही तरतूद नसल्याने व परिसरातील शेतकर्‍यांनाही त्याचे गांभीर्य नसल्याने या सर्वच बंधारे, तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि त्यांची साठवण क्षमता कमी-कमी होत गेली.

याच तलाव, बंधार्‍यामधील पाणी पाझरुन परिसरातील विहिरी भर उन्हाळ्यातही अर्ध्या अधिक भरलेल्या असत. त्यातून उन्हाळ्यातील माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागत होती. मात्र, गाळ साचत गेला तशी विहिरींची पाणी पातळी कमी होऊ लागली, विहिरी कोरड्या पडू लागल्या. त्यावर मात करण्यासाठी शासनाने टँकर सुरु करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्यावर करोडो रुपयांचा खर्च होऊ लागला.

युतीच्या शासन काळात मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे जाळे उभारण्यात आले. मात्र, त्यात वाड्या-वस्त्यांचा विचार न करण्यात आल्याने भर उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडणार्‍या वाड्या-वस्त्यांची संख्या शेकडोने वाढली.

मध्यंतरी राज्यातील काँग्रेस-राष्ट्र्वादी आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जलसंधारण अभियान सुरु करीत धरणे, तलावांमधील गाळ काढण्यासाठी मशिनरी उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, गाळ शेतकर्‍यांनी स्व:खर्चाने उचलून नेण्याची घालण्यात आलेली अट शेतकर्‍यांना निटसी भावली नाही. त्यामुळे केवळ जनजागृती अभावी एक चांगली योजना कागदावरच अडकून पडली.

नंतरच्या भाजपा-सेना युतीच्या काळात जलसमृद्धी अभियानातंर्गत ‘गाळ मुक्त धरण, गाळ मुक्त शिवार’ योजना येताच ‘युवा मित्र’ ने पुढाकार घेतला. शेतकर्‍यांमध्ये जनजागृती केली. तलावांमधील रापलेला गाळ पडीक जमिनीत टाकल्यास जमिनीला सुपिक बनवू शकतो हे त्यांना पटवून दिले आणि गाळ स्व:खर्चाने उचलून नेण्यासाठी त्यांना राजी केले.

’करोना‘ महामारीचा मधला लॉकडाऊनचा वर्ष-सव्वा वर्षाचा काळ वगळल्यास चार-साडे चार वर्षात 84 गावांमधील 182 बंधारे, नाल्यांमधील 23 लाख 6 हजार क्युबिक मीटर गाळ शेतकर्‍यांनी स्व:खर्चाने वाहून नेत 1719 एकर पडीक जमीन सुपीक बनवली तर तालुक्याच्या पाणी साठवण क्षमतेत 81.43 दशलक्ष घनफुटाची भर घातली.

गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पर्जन्य राजा तालुक्यात सरासरी राखूनच कोसळला असला तरी पाणी साठवण्यासाठी गावा-गावांमध्ये आधीपासूनच भांडी तयार होती. त्यामुळे 2019 च्या जुलै महिन्यानंतर यंदाचा 2021 चा जून महिना उगवल्या नंतरही आजपर्यंत तालुक्यातील एकही गावाने अथवा वाडी-वस्तीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केलेली नाही.

तालुका खर्‍या अर्थाने टँकर मुक्त झाला आहे. शासन, सामाजिक संस्था, शेतकरी एकत्र आल्यास कोणती किमया साधता येऊ शकते याचे हे जिते जागते उदाहरण म्हणता येईल.

जामनदीच्या नांदूरशिंगोटे जवळील उगमापासून दोडी, कणकोरी, मानोरी, निर्हले, पांगरी, मर्हळ, मिठसागरेपर्यंतच्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण करीत या नदीला मिळणार्‍या सुरेगाव, दत्तनगर परीसारातील नाल्यांवरील 4 पाझर तलाव, 19 सिमेंट प्लग बंधार्‍यातील गाळ या उपक्रमातून काढण्यात आला. मानोरीतील लेंडी नाला, जाम नाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.

त्यामुळे 8-10 वर्षात पहिल्यांदाच जामनदी 4 महिने दुथडी भरून वहात होती. देवनदीवरील 18 तर म्हाळुंगी नदीवरील 4 ब्रिटीशकालीन वळण बंधार्‍यांमधील गाळ काढण्याबरोबरच त्यांच्यावरील पाट व्यवस्था दुरुस्त करण्यात आली.

भोजापूर धरणाच्या लाभ क्षेत्रातील दातली, पांगरीपर्यंतच्या पुरचार्‍यांची सफाई करण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण भागात पूरपाणी फिरले आणि जिरले. त्याचाही फायदा झाला. मानोरी, कणकोरी, निर्हले, देवपूर भागातील शेतकर्यांनी अनेक वर्षानंतर उसाच्या लागवडीला दिलेले प्राधान्य हे त्याचेच यश आहे.

– मनीषा पोटे, कार्यकारी संचालक, युवा मित्र

- Advertisment -

ताज्या बातम्या