Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवास होणार प्रारंभ; सप्तश्रृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंदिर दर्शनासाठी २४...

उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवास होणार प्रारंभ; सप्तश्रृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंदिर दर्शनासाठी २४ तास राहणार खुले

दिंडोरी । नितीन गांगुर्डे Dindori

- Advertisement -

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर उद्यापासून (रविवार, 11 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे. दुष्काळाचे सावट असले तरीही देवीच्या दर्शनासाठी देशभरातून सुमारे 15 लाख भाविक गडावर हजेरी लावणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण गड परिसर सज्ज झाला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी महाराष्ट्र राज्य धर्मदाय मुख्य आयुक्त अमोघ कलोती, जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे, धर्मदाय सह आयुक्तविवेक सोनुने यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तशृंगी देवीची विधिवत पंचामृत महापूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी मुख्य मंदिरात घटस्थापना करून नवरात्रोत्सवाची अधिकृत सुरुवात होईल. या नऊ दिवसांच्या काळात देवीची पालखी पूजन, नगरप्रदक्षिणा, शतचंडी याग, आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवादरम्यान भाविकांना रात्रंदिवस देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी सप्तशृंगी मंदिर आजपासून चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे.

गडावर येणार्‍या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेचे अत्यंत कडेकोट उपाययोजना केल्या आहेत. संभाव्य चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी गडावर विविध ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, सुरक्षेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी तब्बल 9 ठिकाणी अत्याधुनिक पोर्टेबल पोलीस चौकी केबिन उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वार, पहिली व दुसरी पायरी, शितकडा घाट परिसर, फ्युनिक्युलर ट्रॉली परिसर आणि मंदिर परिसर यांसारख्या अतिसंवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी या केबिन कार्यरत करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पोलीस अधिकारी 24 तास पाळत ठेवून आहेत, जेणेकरून भाविकांना तातडीने मदत मिळू शकेल आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. लाखो भाविकांच्या आगमनामुळे निर्माण होणार्‍या ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत एकत्र येऊन कार्यरत आहेत.

पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि वाहतूक नियंत्रण यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्वतंत्र पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई जाणवू नये म्हणून प्रशासनाने आधीच पाण्याचे नियोजन केले आहे. देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला सुखद व सुलभ अनुभव मिळावा, यासाठी ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. संपूर्ण गडावर चैतन्यमय आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्या