Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखनव्या भारतातील आशेचे झगमगणारे तारे!

नव्या भारतातील आशेचे झगमगणारे तारे!

भारताची जगात तरुणांचा देश अशी ओळख सांगितली जाते. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 35 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या तरुण आहे. तरुणाई कोणत्याही देशाचे आशास्थान मानले जाते. सामाजिक बांधिलकीची मूल्ये तरुणाईत रुजवली तर तरुणाई सामाजिक क्रांती देखील घडवू शकते. हा दृष्टीकोन स्वीकारुन निरलस वृत्तीने काम करणार्‍या अनेक सामाजिक संस्थांच्या शीर्षस्थानी तरुणाईच मोठ्या प्रमाणात आढळते.

तरुणाई, समाजस्वास्थ्यासाठी चौकटीबाहेरचे विचार करु शकते. सामाजिक कामात पाठबळ निर्माण करु शकते. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची क्षमता व ताकद तुलनेने तरुणाईत जास्त असते. अशा अनेक अनुकुलतांचे वरदान तरुणाईला लाभलेले आहे. ‘उठा जागे व्हा! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!’ असा संदेश स्वामी विवेकानंदांनीही तरुणांना दिला. आयुष्याचे ध्येय ठरवून त्याचा पाठलाग करणार्या तरुणाईच्या कौतूककथा अधूनमधून माध्यमात झळकत असतात. यशप्राप्ती किंवा ध्येयपूर्ती सहजसाध्य नसते हे ते कृतीतून दाखवून देतात. वाशिम तालुक्यातील कारंजा लाड येथील एक युवक मर्चन्ट नेव्हीत अधिकारी बनला आहे. त्याचे वडील हमालीचा व्यवसाय करुन कुटुंबाचे पालनपोषण करतात. मार्गदर्शनासाठी कोणतीही शिकवणी लावण्याची त्याच्या घरची परिस्थिती नव्हती. त्याने इंटरनेटलाच मित्र बनवले आणि अभ्यास केला. चिपळूण जिल्ह्यातील मांडकी या छोट्याशा खेडेगावात राहाणारा प्रथमेश राजेशिर्के (Prathamesh Rajeshirke) हा तरुण सनदी अधिकारी बनला आहे. त्याच्या वडिलांना मिळणारे निवृत्तीवेतन हाच त्याच्या घरातील उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत. त्यामुळे परिस्थिती हलाखीचीच.

- Advertisement -

अंतिम परिक्षेच्या काळात त्याच्या सगळ्या कुटुंबालाच करोनाचा संसर्ग झाला होता. संसर्गामुळे प्रथमेशची रक्तातील प्राणवायुची पातळी कमालीची खालावली होती. पण या सगळ्या विपरिततेवर मात करुन त्याने यश मिळवले आहे. अमन जव्हेरी (Aman Jawheri) हा पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळचा रहिवासी. लहानपणीच त्याचे पितृछत्र हरवले. आई बांगड्या विकून घर चालवते. अमनही आईला मदत करायचा. कठोर परिश्रम करुन अमन सीए झाला आहे. नाशिकमधील एक रिक्षाचालक घटमाळे यांची मुलगी स्नेहा परिवहन अधिकारी झाली आहे. रिंकू सिंग (Rinku Singh) हा सध्या आयपीएलचे मैदान गाजवत आहे. त्याचे वडिल गॅससिलेंडर घरोघरी पोहोचवायचे. रिंकूला नववीपर्यंतच शिक्षण घेता आले. अपुर्‍या शिक्षणामुळे त्याला सफाई कामगार म्हणून काम करावे लागले. त्याला क्रिकेटचे वेड होते. काम करता करता त्याने ते वेडही जोपासले. नुकतीच त्यानेे कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल संघाला विजयश्री मिळवून देणारी कामगिरी त्या संघातून केली.

समाजात अजुन अशी बरीच उदाहरणे आढळतात. या यशोगाथा आपल्याला काय सांगतात? कधी ना कधी विपरित परिस्थितीचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. वर उल्लेखिलेल्या युवक-युवतींना तो करावाच लागला. पण रडतराऊ बनून, हातावर हात ठेऊन ते कुढत बसले नाहीत. परिस्थितीलाच आव्हान देऊन शून्यातून विश्व निर्माण करण्याचे ध्येय त्यांनी साध्य केले. राखेतून भरारी घेणार्या फिनिक्स पक्षाचा आदर्श समोर ठेवला आणि स्वत:ची जागा निर्माण केली. जुना भारत कोणता? नवा भारत कोणता? भारत कधीपासून बदलतोय? याविषयीचे वादंग नेतेमंडळी माध्यमांवर सतत चघळतच असतात.

कुणी कसलेही यश मिळवले तरी ते श्रेय ओरबाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. तथापि सामाजिक बदलाचे जे निमित्त ठरतात त्यांची समाजही दखल घेतो. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो. त्यातुनच अशा कुशल तरुण तरुणींना यशाचे पुढचे टप्पे आत्मसात करण्याची प्रेरणा मिळत असते. असे कर्तबगार युवक-युवती स्वतंत्र भारतातील आशेचा किरण आहेत. त्यांचा आदर्श तरुणाई घेईल आणि समाजाला नवा करत करत आपलेही स्थान निर्माण करेल अशी आशा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या