Friday, May 3, 2024
Homeब्लॉगबोन्साय... निसर्गदत्त सृजनशीलतेला खतपाणी

बोन्साय… निसर्गदत्त सृजनशीलतेला खतपाणी

सुदैवाचं अदृश्य सहावं बोट असणारे हातच लिहू शकतात अभिजात कविता. अनुभवांचं बाष्प बनून शब्द बरसतात आणि कवितेचा आशय हिरवागार होत जातो. कविता, मनाचा प्रदेश अथांग करून टाकते. इतरांबद्दल वाटणाऱ्या आस्थेचा परीघ रूंदावत जातो. हृदयाचा गाभारा प्रेमाच्या अलवार संवेदनांनी भरून जातो.

कविता दुःखाला कोरून काढते आणि आनंदाची भव्यता शिल्पांकित होते. ममतेचे झरू लागतात झरे. करूणेचा महासागर ओतप्रोत होत जातो. परस्परविरोधी विचारधारांमध्ये कविता उभारते संवादाचा भरभक्कम पूल. जिथे मौन संपतं आणि आवेगाला भरती येते त्या संधीकालावर कविता रेंगाळत असते. ती मिरेच्या भजनात असते आणि कबीराच्या दोह्यात. ना प्रकाश ना काळोख अशा गूढतेने अलंकृत असते कविता. कविता जगण्याचा प्रवाह खळाळता करून देते. नितळ जाणीवांना प्रवाहीत करते. ती असते एक दूरस्थ बेट परंतु सभोवताल असतो तिच्या नजरेच्या टापूत. ती स्वातंत्र्याचा जयजयकार करते. ती बंधमुक्त असते. मातृभूमीच्या ओढीने ती झोकून देते स्वतःला लाटांच्या अक्राळविक्राळ जटांवर. किनारा तिच्या पाद्यपूजेसाठी जयोस्तुतेचा महन्मंगल मंत्र जपत असतो. कवितेच्या उगमापाशीच भाषेचे प्राचिन अवशेष सापडतात. तिच्या चिरंतन मूल्यव्यवस्थेने भाषेचा प्राकृतिक डोलारा तोलून धरलेला असतो. ती ध्वनी देते, स्वर देते. तिच्या व्यंजनांच्या मूलद्रव्यानेच भाषा समृद्ध होत जाते. कवितेपाशी नसतो कुठलाच भेदभाव. प्रेमाच्या निळसर पारदर्शी छत्राखाली तिने अवघं ब्रम्हांड कवेत घेतलेलं असतं. कविता हे जीवनप्रवाहाचं दुसरं नाव असतं.

- Advertisement -

कवितेविषयीची ही चिरंतन भावना माझ्या मनात कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. कारण त्या मूल्यव्यवस्थेनेच माझ्या कवितेत अखिल मानवजातीविषयी वाटणारा कळवळा काठोकाठ भरून ठेवलेला आहे. सुरवातीच्या काळात कविता लिहू लागलो तेव्हा त्या कुणाला दाखवण्याचं धाडस झालं नाही. कुठे प्रसिद्धीसाठीही पाठवल्या नाहीत. स्वान्तसुखाय अशा आनंदात न्हात असतानाच पाच वर्षे उलटून गेली. त्या पाच वर्षांनीच खऱ्या अर्थाने कविता घडवली. पूर्वसुरींच्या प्रभावातून निसटताना तिला स्वतःचा चेहेरा सापडत गेला. स्वतंत्र शैली आणि स्वतःच्या अनोख्या शब्दकळेने कवितेच्या रूधिरात जैविक अस्मितेचा प्राणवायू भरला.

काळाच्या पडद्याआड राहून योग्य वेळेची वाट पाहिल्यामुळे संधीचा एकेक दरवाजा कवितेसाठी हळूवारपणे उघडत गेला. दर्जेदार वाड्मयीन नियतकालिकातून ती दरवळत राहिली. छोट्यामोठ्या मैफिलीतून, कविसंमेलनातून तिने तालबद्ध पदन्यास टाकले. जाणकारांचं लक्ष तिने वेधून घेतलं. त्यांच्या प्रशस्तीपत्राने कविता भारावून गेली. आणि त्याचवेळी काही नतद्रष्ट वृत्तींच्या असूयेचा विषयसुद्धा झाली. मग त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे तिला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बांध घातला. तिने तो मोडून टाकला. त्यांनी पंख छाटण्याचा प्रयत्न केला. तिने आणखीनच उंच भरारी घेतली. हे प्रातिनिधीक चित्र होतं. जगभरातल्या नव्या कवितेच्या वाट्याला येणारा हा भोगवटा मला कवितेतून मांडावासा वाटला. साऱ्या शक्यता, सगळ्या ऊर्मी आणि अवघी सृजनशीलता संपवून टाकून सर्जनाची वाढ खुंटवली जाते. छोट्याशा कुंडीत त्याचा ‘शो’पीस होऊन जातो. ना सावली, ना फळ. जीवनाची परिभाषा बदलून जाते. ‘बोन्साय’ होणं म्हणजे नैसर्गिक अविष्कारावर होणारा गहिरा घाव मुकाटपणे सोसत राहणं.

एकोणीसशे शहाण्णव साली ‘बोन्साय’ कविता लिहून झाली. तिच्यातील कडवटपणामुळे मी ती कुठेच प्रसिद्धीसाठी पाठवली नाही. पुढच्याच वर्षी अहमदनगरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळालं. तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात दोन कविसंमेलनं होती. सुप्रसिद्ध कवी सतीश काळसेकर अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध भाष्यकार कवी रामदास फुटाणे यांचं सूत्रसंचालन असणाऱ्या कविसंमेलनात मी निमंत्रित होतो. चार जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी दुपारच्या सत्रात पार पडलेलं ते कविसंमेलन न भूतो न भविष्यती असंच झालं. संतोष पद्माकर पवारच्या ‘कविता मला भेटली’ या कवितेने कहर केला. रसिकांनी अवघा मांडव डोक्यावर घेतला. कवींच्या वर्तनव्यवहारावर परखडपणे ताशेरे ओढणाऱ्या त्या कवितेचं सर्व स्तरातून स्वागत झालं. त्या गदारोळात तोच धागा पुढे नेत मी ‘बोन्साय’ कविता ऐकवली. रसिकांनी ती अंतर्मुख होऊन ऐकली. संमेलन झाल्यावर तीनही दिवसांचा ऐवज एकत्र करून कवी अरूण शेवते यांनी संमेलनाचा समग्र मागोवा घेणारा ‘संवाद’ हा ग्रंथ संपादित केला. पाचशे पानांच्या त्या अभूतपूर्व महाग्रंथात ‘बोन्साय’ कविता दिमाखात प्रसिद्ध झाली.

‘संवाद’ ग्रंथावर अनेक जणांनी अनेक ठिकाणी लिहिलं. बहुश्रुत साप्ताहिकात कवयित्री निता भिसे यांनी ‘संवाद – साहित्य संमेलनाचा अनोखा दस्तऐवज’ या शीर्षकाखाली संवाद ग्रंथाचा सुंदर परिचय करून दिला. ‘ज्या शब्दांत विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य आणि चिंतनाची पार्श्वभूमी आहे अशा शब्दांच्या अनेक लडी नगरच्या साहित्य संमेलनात उलगडल्या गेल्या’. असा उल्लेख करून निता भिसेंनी तीन बाबी झलक म्हणून मांडल्या. सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके यांच्या ‘प्रार्थना’ कवितेतील काही ओळी, सुप्रसिद्ध साहित्यिक, अभिनेता आणि साहित्य संमेलनाचे उद्घाटक गिरीश कर्नाड यांच्या भाषणातील अंश तसेच ‘बोन्साय’ कवितेच्या सुरवातीच्या चार ओळी. या दिग्गजांच्या लिखाणासोबत ‘बोन्साय’चा, विचारप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य आणि चिंतनाची पार्श्वभूमी असणारं लेखन असा जो उल्लेख झाला त्याने मी फार सुखावून गेलो.

एका लोकप्रिय दैनिकातील बित्तमबात सदरात कविमित्र दादासाहेब कोतेने ‘दिवस टाळ्यांच्या कवितांचे’ असा एक लेखच लिहिला. लेखाचा शेवट करताना त्याने लिहिलं होतं, ‘या सर्व गोंधळात हातून काही चांगले सुद्धा सटकले. आमचे एक कविमित्र, नवोदितांमध्ये चांगलं लिहिणारे दमदार कवी. त्यांनी त्यांची ‘बोन्साय’ कविता म्हंटली. कविता खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी होती. परंतु किती जणांनी ती गंभीरपणे घेतली ? मग अंतर्मुख होणं दूरच राहिलं ! न राहून मी त्याला म्हणालो, मित्रा हे टाळ्यांच्या कवितेचे दिवस. त्याला आपण काय करणार ?’

‘कवींची प्रतिष्ठा संमेलनात नेमकी कुणी घालविली ?’ या एका दैनिकातील लेखात कविमित्र हेरंब कुलकर्णी लिहितो, ‘ज्ञानेश्वर, टागोरांची परंपरा आपण सांगणार असू तर प्रतिष्ठा मागून मिळत नाही. ती दर्जापाठोपाठ आपोआप येते. सूर्यकुलाचा वारसा सांगायचा आणि मेणबत्त्या घेऊन गावोगाव कविता वाचण्यासाठी आटापिटा करायचा हे थांबायला हवे. त्याच त्या कविता ऐकवणाऱ्या कवींनी कवींसाठीचे हक्काचे ‘निमंत्रित’ व्यासपीठ गमावले आहे. शशिकांत शिंदे नावाचा कवी लिहितो – त्याच त्या टाळ्या घेणाऱ्या कविता वाचून, मी लपवीत तर नाही ना माझ्या सर्जनशीलतेला आलेलं वांझपण…?’

‘बोन्साय’ कवितेने माझ्यातला न्युनगंड काढून टाकला. माझ्यात असणाऱ्या शक्यतांना, अनावर ऊर्मीला आणि निसर्गदत्त सृजनशीलतेला खतपाणीच घातलं. कवितेचं झाड आकाशगामी होताना डेरेदार झालं, सळसळत्या चैतन्याने बहरत गेलं….

बोन्साय

त्याच त्या टाळ्या घेणाऱ्या कविता वाचून

मी लपवीत तर नाही ना माझ्या सर्जनशीलतेला आलेलं वांझपण ?

की आत्मविष्काराच्या उथळ मुळ्यांना उखडतंय

मागणी तशा पुरवठ्याचं सामूहिक प्रलोभन ?

गावोगावच्या संमेलनातून मी मिरवत राहतो

कवितेवर अनाकलनीय भाषेतून बोलत राहतो

हार, तुरे, शाल, श्रीफळ नम्रपणे स्वीकारून ;

सन्मानाची मोरपिसे अहंतेवर अलगद फिरवत राहतो.

व्यासपीठावरून ते उतरू देत नाहीत खाली

की पायउतार व्हायला माझेच पाय डगमगतात

नव्या चेहेऱ्यांविषयी मी बोलू लागलो की

का कोण जाणे माझे शब्दच लुळे पडतात.

मग मला स्फुरू लागतात बोन्सायच्या विचित्र कल्पना,

तरीही साहित्यबाह्य वगैरे असे मुळीच वाटत नाही

सराईत माळ्याने करावे रोपट्यावर कलम तसे मीही करतो ;

वेदनांची काळजी घेत गेलं की अंतरंगही फाटत नाही !

-शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या