Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedदेश भयमुक्त करणार्‍या ‘त्या दोघी’…

देश भयमुक्त करणार्‍या ‘त्या दोघी’…

जगाला कोरोनानं विळखा घातल्यानंतर मोठमोठ्या देशांचे नेते हैराण झाले. काहींनी चुकीची पावलं उचलली. काहींनी त्यांचं अंधानुकरण केलं. अमेरिका, ब्रिटनसह मोठमोठ्या देशांचे नेते यासंदर्भात गोंधळून गेलेले असताना तैवान आणि न्यूझीलंडमधल्या महिला नेतृत्त्वाने अजिबात गडबडून न जाता कोरोनाला रोखण्यासाठी व्यूव्हरचना केली. हुशारीने उपाययोजना केल्या आणि आपल्या देशावरील संकट दूर केलं. त्यांची ही लक्षवेधी यशोगाथा.

भागा वरखडे

जग एकीकडे जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात गुंग असताना कोरोना मात्र जगाला विळखा घालत होता. चीनपासून 12 हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेत तर कोरोनानं थैमान घातलं. सर्वात आधी कोरोनाचा प्रकोप अनुभवणार्या चीनच्या शेजारी तैवान या देशाचं नेतृत्त्व एका महिलेकडे आहे. जंग जंग पछाडूनही या महिलेला पराभूत करण्यात चीनला अपयश आलं. साई इंग-वेन असं त्यांचं नाव. चीनपासून तैवान अवघ्या साडेनऊशे किलोमीटरवर आहे. अमेरिकेत आतापर्यंत वीस लाख कोरोनाबाधित आणि दीड लाखांहून अधिक मृत्यू असताना तैवाननं मात्र कोरोनाला अटकाव केला. अमेरिका, भारतात टाळेबंदी लागू करण्यात आली. या दोन देशांमधली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. असं असताना तैवाननं मात्र टाळेबंदी केलीच नाही. फक्त नागरिकांना चीनमध्ये जाण्यास मज्जाव केला. तसंच तिकडून कुणी आपल्या देशात येणार नाही, याची डोळ्यात तेल घालून दक्षता घेतली. चीनला जाणारी आणि येणारी विमानउड्डाणं थांबवली. तैवाननं कोरोनाशी सामना करण्यासाठी स्वतःला स्वयंपूर्ण केलं.

स्वच्छतेसाठी अल्कोहोलचं उत्पादन 75 टक्क्यांनी वाढवलं. देशात पीपीई किट बनवली. अर्थात आता भारतही पीपीई किटस्च्या उत्पादनात स्वंयपूर्ण बनला आहे; परंतु तोपर्यंत आपण 12 कोटींहून अधिक लोकांच्या नोकर्‍या गमवल्या. आपली रुग्णसंख्या तीन लाखापर्यंत गेली. सात हजारांहून अधिक मृत्यू झाले. तैवानमध्ये केवळ 453 जणांना कोरोनाची लागण झाली. तेवढी प्रकरणं तर महाराष्ट्रातल्या एका शहरात आहेत. तिथे कोरोनामुळे अवघे सात मृत्यू झाले आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तैवानमध्ये टाळेबंदी केली गेली नाही. फक्त शाळा-महाविद्यालयं आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. तेही काही काळच. त्याला कारण आहेत तैवानच्या अध्यक्ष साई इंग-वेन. त्या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष असून दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी संकट लक्षात घेऊन पटकन निर्णय घेतले आणि कोरोनासारख्या साथीच्या रोगावर विजय मिळवला. त्यांनी कोरोनावर विजय कसा मिळवला, हे खरं तर जगानं अभ्यासण्यासारखं आहे. जागतिक आरोग्य संघटनेशी तैवानचा वाद आहे; परंतु या संघटनेने दिलेल्या इशार्‍याकडे तैवाननं कधीच दुर्लक्ष केलं नाही. कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये 8 डिसेंबर रोजी आढळला; परंतु तो कोरोनाबाधित आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं. त्या वेळी त्याच्याकडे न्यूमोनियाचा रुग्ण म्हणून पाहिलं गेलं.

डिसेंबरच्या शेवटी, वुहानमधल्या रुग्णालयात डॉक्टर ली वेनलिंग यांनी प्रथम कोरोना विषाणूचं वर्णन केलं; पण चीन सरकारनं ली यांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्यावर अफवा पसरवल्याचा आरोप केला. त्या वेळी ली यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट्सही व्हायरल झाले आणि न्यूमोनियासारख्या नवीन आजाराबद्दल इशारा दिला गेला. संपूर्ण जग नवीन वर्षाच्या उत्सवाची तयारी करत असताना तैवानच्या रोग नियंत्रण केंद्रानं 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी नवीन रोगाबद्दल सतर्कतेचा इशारा दिला.
31 डिसेंबर रोजी चीनमध्ये अचानक 27 घटना घडल्या. त्यानंतर, तैवान सरकारनं एक सल्लागार नेमला. वुहानमधून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू केली. 21 जानेवारी रोजी तैवानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर इथल्या सरकारनं वुहानला जाणार्‍या लोकांना भावनिक आवाहन करून रोखलं. 26 जानेवारी रोजी सरकारने चीनमध्ये जाणारी आणि येणारी सर्व विमानं रोखली. चीनमधून परतणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी साथरोगाची नियमावली लागू केली. त्यांचा संसर्ग इतरांना होणार नाही, याची दक्षता घेतली. मुखपट्ट्यांची कमतरता असल्यानं निर्यातीवर बंदी घातली. विषम-सम सूत्र लागू केलं.

देशात 24 जानेवारीला घालण्यात आलेली बंदी अगोदर काही काळासाठी होती. नंतर ती जूनअखेरपर्यंत लागू करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे लोक आवर्जून मुखपट्टी वापरायला लागले होते. त्यांच्यासाठी पुरेशा मुखपट्ट्या मिळतील, याची व्यवस्था सरकारनं केली. सर्वांना मुखपट्ट्या मिळाव्यात, म्हणून तीन फेब्रुवारी रोजी सरकारनं ऑड-इव्हन सूत्र लागू केलं. इथल्या लोकांकडे राष्ट्रीय आरोग्य विमा कार्ड आहे. त्याचाच वापर केला गेला. तैवानमध्ये टाळेबंदी लादण्यात आली नव्हती. इथे सार्वजनिक वाहतूक सुरूच होती. 31 मार्च रोजी परिवहन मंत्री लिन चिया-लुंग यांनी ट्रेन आणि बसमध्ये प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना मुखपट्टी घालणं अनिवार्य केलं.

मुखपट्टी न घालता बस-ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न करणार्‍याला 15 हजार तैवानी डॉलर्स म्हणजे सुमारे 38 हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा त्याच दिवशी दिला गेला आणि त्याची कडक अंमलबजावणीही झाली. तंबाखू व दारू कॉर्पोरेशन आणि तैवान शुगर कॉर्पोरेशनला फेब्रुवारी महिन्यात अल्कोहोलचं उत्पादन 75 टक्के वाढवण्याचे आदेश दिले. मार्चमध्ये सरकारनं डिजिटल थर्मामीटरच्या निर्यातीवर बंदी घातली. साईं वंग वेग यांनी तैवानच्या कंपन्यांना पीपीई किटस्चं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यास सांगितलं. अशी किट्स अमेरिकेतून आयात करण्याची वेळ येऊ नये, म्हणून ही दक्षता घेतली गेली. इतकंच नाही, तर एक मेपासून सरकारनं हँडवॉश आणि जंतुनाशकांची निर्यात बंद केली. तैवानच्या सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन केल्यानं त्या राष्ट्राला कोरोनावर मात करता आली.

तैवानची ही यशोगाथा प्रेरीत करत असतानाच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपला देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. तिथे थोडा वेगळा मार्ग अनुसरण्यात आला; परंतु या दोन देशांमधल्या महिला नेतृत्वाने भल्याभल्या नेत्यांना जमलं नाही, ते करून दाखवलं. 22 मे नंतर न्यूझीलडंमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तिथली बंधनं टप्प्याटप्प्यानं मागे घेण्यात आली. आता तिथले नाईट क्लबदेखील उघडणार आहेत.

आपला देश कोरोनामुक्त झाल्याचं समजलं तेव्हा जेसिंडा यांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह आनंदानं उडीच मारली. जेसिंडा म्हणाली, मला माझ्या देशाचा आणि इथल्या लोकांचा अभिमान आहे. आम्ही एकत्र येऊन खूप कठीण लढाई जिंकली. इथली शेवटची रुग्ण 50 वर्षांची महिला होती. ऑकलंडमधील नर्सिंग होममध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले.

न्यूझीलंडमध्ये कोरोनाविरुद्धची लढाई सोपी नव्हती. तिथे यशाचं सूत्र एकच होतं, ते म्हणजे सरकारचे प्रयत्न आणि लोकांचं पाठबळ. सामान्यातील सामान्य होऊन वावरणार्‍या आणि दहशतवादी हल्ल्याचा तितक्याच कठोर होऊन नि:पात करणार्‍या जेसिंडा यांचा अभ्यासही दांडगा आहे. हॉटेलमध्ये भोजनासाठी रांगा लावून आपली वेळ येण्याची वाट पाहणार्‍या आणि आपल्या लहान बाळाला संसदेत घेऊन जाणार्‍या जेसिंडा लोकांना आपल्यातल्या वाटतात. त्यामुळे त्यांच्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.
न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. ती 75 दिवस होती. त्यानंतर टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात सरकारनं जनतेला अपील केलं होतं. ते म्हणजे लोकांनी आपल्या देशातील पर्यटन स्थळांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे सरकारचं उत्पन्न वाढेल आणि लोकांचं मनोरंजन होईल. न्यूझीलंडची लोकसंख्या पन्नास लाखांहून कमी आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात इथे कोरोनाचा शिरकाव झाला. सरकारने या अदृश्य शत्रूविरूद्ध युद्धाची तयारी सुरू केली. वैद्यकीय तज्ज्ञांसह चार बिंदू कार्यक्रम बनवला. त्याचे 43 गुण होते. प्रत्येक टप्प्यावर काही बिंदू समान होते. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. दर आठवड्याला आढावा घेतला गेला. या देशात 1154 कोरोनाग्रस्त आढळले. त्यातले 22 लोक मरण पावले. सुमारे तीन लाख लोकांची चाचणी करण्यात आली.

कडक मार्गदर्शक सूचनांमुळे न्यूझीलंड सरकारनं खेळाचं मैदान, उद्यानं आणि लहान मुलांच्या बागेतल्या खेळण्यांवरही बंदी घातली. आताही सरकार शांत झोपणार नाही. ते दक्ष असेल.
15 जूनपर्यंत प्रत्येक संशयितावर नजर ठेवली जाईल. असं असलं, तरी खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमावर कोणतंही बंधन नाही. 28 फेब्रुवारीपासून इथली सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यात आली आहे. इथे रग्बी आणि इतर खेळ सुरु झाले आहेत. त्यासाठी मैदानं खुली करण्यात आली असून प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

न्यूझीलंड सरकारनं एनझेड कोविड ट्रेसर ऍप लाँच केलं. हे भारताच्या आरोग्य ऍपपेक्षा थोडंसं प्रगत आहे. या ऍपनं कोरोना नियंत्रित करण्यास खूप मदत केली आहे. एखादी व्यक्ती कार्यालय, सार्वजनिक इमारत, दुकान किंवा मॉलमध्ये गेल्यास त्याला ऍपमधून क्यूआरकोड स्कॅन करावा लागेल, असं बंधन घालण्यात आलं होतं. समुदाय संसर्गाच्या काळात लोकांना घरीच ठेवलं गेलं. फक्त आपत्कालीन सेवा सुरू होत्या. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद होती. घरातून काम पसंत केलं गेलं. आपल्याकडे जशी लाल, नारंगी आणि हरित क्षेत्रं होती, तशीच तिथे चार गटात विभागणी करून काटेकोर पालन केलं गेल्यानं देश कोरोनामुक्त झाला. अशा प्रकारे दोन महिलांनी आपल्या देशातर्फे लढत कोरोनाला हुशारीने मात दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या