Sunday, May 19, 2024
Homeनगरचोरी करायला आले, हाती काहीच लागले नाही म्हणून आग लावून गेले

चोरी करायला आले, हाती काहीच लागले नाही म्हणून आग लावून गेले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील जुने तार ऑफीसजवळच असलेल्या एका बुक स्टॉलच्या गोडावूनमध्ये काही चोर चोरी करण्यासाठी आले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही म्हणून त्यांनी गोडावूनला आग लावून निघून गेले. परिसरातील आणखी एका ठिकाणी चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या आगीत सुमारे 6 ते 7 लाख रुपये नुकसान झाले आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील स्टेट बँक चौक, कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये यश संतोष अग्रवाल यांचे वह्या, पुस्तके, स्टेशनरीचा व्यवसाय असून या दुकानातील मालाचे गोडावून तेथून जवळच असलेल्या जुने तार ऑफीस शेजारीच असून या गोडावूनमध्ये वह्या, पुस्तके व स्टेशनरी असा 40 ते 50 लाख रुपयांचा माल आहे. काही अज्ञात चोरट्यांनी या गोडावूनचा दरवाजाची कडी कोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. या ठिकाणी केवळ, वह्या पुस्तके असा माल असल्यामुळे त्यांना नेण्यासारखे काहीच नसल्यामुळे चिडलेल्या या चोरट्यांनी आग लावून निघून गेले.

आग लागल्याची माहिती गोडावून शेजारी राहत असलेल्या सौ. दराडे यांनी मोबाईलवरुन दिली. तातडीने आम्ही धावपळ करत त्या ठिकाणी आलो. काहींनी नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंब बोलाविला होता. त्याठिकाणी असलेल्या एका खोलीतील माल जळून खाक झाला. तर अन्य खोल्यांमधील माल आगीपासून बचावला असला तरी आग विझविण्यासाठी आलेल्या पाण्यामुळे अन्य खोल्यांमधील मालही पाण्यामुळे खराब झाला आहे. आगीत सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले असून पाण्यामुळे 1 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन सर्व माहिती घेतली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात यश संतोष अग्रवाल यानी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 306/2022 प्रमाणेअज्ञात आरोपीविरुध्द भादंवि कलम 448, 436 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या