मुंबई | Mumbai
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा प्रचाराचा वेग वाढतोय. या प्रचारादरम्यान, नेते एकमेकांवर अनेकदा टोकाची आणि वादग्रस्त टीकाही करत आहेत. टीका करताना त्यांना भान जपता येत नसल्याचे भासते आहे. अशाच एका भाषणादरम्यान हिंदुत्वाच्या मुद्दावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना नेत्याने आपली पातळी सोडल्याचे पहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुंबईत प्रचार सभेदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांचा पराकोटीचा द्वेषही दिसून आला. तो बुटका मंत्री नेपाळी दिसतो अशी टीका त्यांनी केली. यासोबतच त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया देत, “मला ताकद मिळाली, तर अशा मंत्र्याची जीभ कापली नाही, तर एका बापाची औलाद नाही,” असे वक्तव्यही केले आहे.
अबू आसिम आझमी यांनी नितेश राणेंच्या हिंदुत्वविषयक आणि धार्मिक मुद्द्यांवरील विधानांचा संदर्भ देत आपला रोष व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, “एक मंत्री उघडपणे मस्जिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा करतो. आम्ही काय कमकुवत आहोत का? आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आजपर्यंत आम्ही कोणत्याही मुसलमानाला मंदिराबाहेर उभे राहून घोषणा द्यायला सांगितले नाही. उलट रामनवमीच्या दिवशी आम्ही पाणी देण्यासाठी उभे राहतो. मात्र, देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावेच लागेल, अशाप्रकारची विधाने केली जातात. या अशा विधानांवर आमचा आक्षेप आहे,” अशी प्रतिक्रिया आझमींनी दिली.
नितेश राणे काय म्हणाले होते?
हिंदुत्व आणि राष्ट्रवाद, रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी आपण काम करतो. सामाजिक ,धार्मिक ध्रुवीकरणासाठी नाही. धार्मिक मिरवणुकीवरील दगडफेकीवर भाष्य करताना ईद अथवा मोहरम दरम्यान असे प्रकार घडत नाहीत. पण रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक कशी होते असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. ईद शांतीपूर्ण होत असेल तर मग रामनवमीमध्ये अशी गडबड का करण्यात येते असे राणे यांनी विचारले होते.आपला एखाद्या खास समुदाय, धार्मिक गटाला विरोध नाही. मी देशभक्त, राष्ट्रभक्त मुस्लिमाविरोधात नाही. जे लोक जिहाद करु पाहात आहे, त्यांना विरोध करणे स्वाभाविक असल्याचे राणे म्हणाले.




