Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखनया खून है नयी उमंग है, अब है नयी जवानी!

नया खून है नयी उमंग है, अब है नयी जवानी!

आज २६ जानेवारी २०२२! भारत देश आज ७३ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. देशाने स्वीकारलेल्या राज्यघटनेची अंमलबजावणी त्यादिवशी सुरु झाली आणि देशात लोकशाहीचे पर्व सुरु झाले. राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल पावणेतीन वर्षांपेक्षा जास्त दिवस सुरु होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने घटनेचा मसुदा तयार केला. हा दिवस सर्व भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून उत्साहाने साजरा करतात. दिल्लीत राजपथावर परेड होते. यानिमिताने देशाच्या संरक्षणाच्या ताकदीचे प्रदर्शन केले जाते. पण त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, विविधतेतून एकता आणि सांस्कृतिक वैविध्याचेही दर्शन होते. हीच मूल्ये लोकशाही बळकट करतात. या मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ती मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघातक प्रवृतींचा बिमोड करणे हे सरकारचेही कर्तव्य आहे. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा केला जात आहे. देशातील स्वातंत्र्यवीरांचा परिचय करून देणारी मालिका आकाशवाणीवरून त्यानिमित्त रोज प्रसारित केली जात आहे. असंख्य वीरांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली. त्या आहुती स्वातंत्र्य मिळण्यास सहाय्यभूत ठरल्या. त्यामुळे लोकशाही किती अमूल्य आहे याची जाणीव नागरिकांना होते. यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती होलोग्राम प्रतिमेचे अनावरण झाले. त्याजागी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. नेताजींनी त्यांच्या पूर्ण वाटचालीत राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, विविधतेतून एकता आणि सर्वधर्मनिरपेक्षता ही मूल्ये कशी दृगोच्चर केली होती हे त्यांचे नातू सुब्रतो घोष यांनी एका मुलाखतीत बोलताना नुकतेच सांगितले आहे. नेताजींनी त्यांच्या सैन्यात महिला सुद्धा रेजिमेंट उभी केली होती. तथापि नेताजींच्या भाषणांचा वापर विशिष्ट समुदायांच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी केला जाऊ लागला आहे हे दुःखदायक आहे असेही त्यांनी त्या मुलाखतीत बोलून दाखवले. नेताजी यांचा पुतळा उभारला जाणे आनंददायी आहेच पण त्यांचे अनमोल कालातीत विचार प्रत्यक्ष कृतीत आणले जावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सत्तेसाठी राजकारण होतच राहील. तथापि लोकशाहीच्या मूल्यांकडे आणि स्वातंत्र्यवीरांच्या विचारांकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातूनच पाहिले जायला हवे. जुने ते सगळे मोडीत काढून नव्याची उभारणी करण्याची महत्वाकांक्षा आणि मोह सगळ्यांनाच प्रसंगोपात होतच असतो. पण जुने मोडीत काढतानाही निरपेक्ष भावना लोकांच्या अनुभवास यायला हवी. सध्या तशी ती येते का याचा शोध जाणते नेते घेतच असतील. दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने विविध पुरस्कारांची घोषणा केली जाते. गुणवंतांची निवड नीरक्षीर विवेकबुद्धीने केली जाते असे लोक तरी मानतात. काही नावे कळत-नकळत राहून जातात असे जनतेला वाटण्याची संधी मिळू नये याची दक्षता घेतली जात असेल अशी अपेक्षा जनतेने करावी का? भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभर ओळखला जावा या दृष्टीनेही सतत प्रयत्न चालू आहेत. ‘ नया खून है नयी उमंग है, अब है नयी जवानी’ असे म्हणत सामाजिक समस्यांना भिडणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांचे जगणे सुसह्य व्हावे असा प्रयत्न ते करत आहेत. अशा काही नवउद्यमींच्या पाठीवर केंद्र सरकारने शाबासकीची थाप मारलीच आहे. पण त्याचबरोबर तरुणाईत लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी मेहनत घेतली जावी ही अपेक्षा पूर्ण होत आहे का? त्यांच्यात वैचारिक दुफळी माजवण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील का? नव्हे, तसे व्हायलाच हवे. कारण याच तरुणाईच्या भरवशावर देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले गेले. जात आहे. तरुणाईत सामाजिक विघटनाची दुष्प्रवृत्ती रुजवणे अंतिमतः लोकशाहीच्या आणि देशाच्या दृष्टीने घातकच ठरेल. प्रजासत्ताक अखंड चिरायू होण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र यांचे विचार अमलात आणले जावेत अशीच सर्व भारतीयांची अपेक्षा असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या