Wednesday, May 14, 2025
HomeनगरSangamner : सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडी जाहीर

Sangamner : सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडी जाहीर

अध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर पांडुरंग घुले उपाध्यक्ष

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यानंतर सभासद व जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले यांची एकमताने निवड झाली.

संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या पदाधिकार्‍यांची निवड झाली. अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपत गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी पांडुरंग घुले यांच्या नावाची सूचना विजय रहाणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले. यावेळी नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, सतीश वर्पे, डॉ. तुषार दिघे, रामनाथ कुटे, नवनाथ अरगडे, विनोद हासे, गुलाबराव देशमुख, रामदास धूळगंड, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, अंकुश ताजणे, लता गायकर, सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, संपत डोंगरे आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त, काटकसर, पारदर्शकता या आदर्श तत्त्वावर व विचारांवर संगमनेरचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे. सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये अनेक अडचणी आहेत. खासगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक हंगाम हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो. कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात. यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे. कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा आल्या पण सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने तो फुगा फुटला.

राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो आहे. मात्र या चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी करावी लागणार आहे. आता वातावरण बदलले आहे. तालुक्यात दहशत वाढते की काय? असा प्रश्न आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने लढा. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून सांगितली पाहिजे. असे सांगताना आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त काम करावे लागेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी – थोरात
जनतेच्या आशीर्वादाने व नेतृत्वाच्या विश्वासाने राज्यभरात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. या पदांचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आपण केला. विधानसभेच्या निवडणुकीत अपघात झाला. परंतु यापुढे सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन काम करायचे आहे. पक्षनेतृत्वाने कायम विश्वास टाकला असून राष्ट्रीय पातळीवरील कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या समितीमध्ये पहिल्या 21 जणांमध्ये आपला समावेश आहे. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील विविध जबाबदार्‍यांसह सध्या गुजरातची जबाबदारी आहे. उद्या दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असून राज्य पातळीवरही महत्त्वाच्या बैठकांसाठी सातत्याने आग्रह असतो. हा सन्मान तालुक्याच्या जनतेचा असून सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrigonda : ‘त्या’ कंपनीकडून गुंतवणूकदारांची दिशाभूल

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली...