इंदापूर । Indapur
महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत असतानाच, आता इंदापूर तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात क्रूझर जीपमधील तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वेगात असलेल्या गाडीचा टायर अचानक फुटल्याने हे भीषण संकट ओढवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एम.एच.१४ एल.बी.१६१३ या क्रमांकाची क्रूझर जीप लोणी देवकर एमआयडीसीच्या दिशेने जात होती. गाडीचा वेग मर्यादेत असतानाच अचानक टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही जीप रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या एम.एच.१२ वाय.क्यू.६६०३ क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझर जीपच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात मृत्यू झालेले तिघेही तरुण लोणी देवकर एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. मृतांची ओळख पटली असून, यामध्ये प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), शशांक कोटिया (वय ३२, रा. गौतमनगर, मध्य प्रदेश) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, रा. त्रीलोकनगर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. कामावर जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र अपघात इतका गंभीर होता की या तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, सहाय्यक फौजदार बालगुडे, जगदाळे आणि त्यांच्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत केली. टायर फुटल्याने गाडीचा ताबा सुटणे हे या अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इंदापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




