file photo
देशदूत डिजिटल विशेष
नाशिक | प्रतिनिधी
अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणजे ‘आयर्न मॅन’ स्पर्धा होय. नियमित क्रीडाविश्वात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नाशिककरांच्या त्रिकुटाने आज हि अवघड अशी स्पर्धा पार करून नाशिककरांच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे.
प्रशांत डाबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले असे या त्रिकुटाचे नाव आहे. डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब मध्ये हे त्रिकुट सराव करत होते, तर त्यांना डॉ. मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन याप्रसंगी लाभले. विशेष म्हणजे, नाशिकचे यंदाचे तीनही खेळाडू चाळीशी ओलांडलेले होते. यात प्रशांत डाबरी ५६, महेंद्र छोरीया ४३ तर डॉ. अरुण गचाले ४० वर्षांचे आहेत.
आतापर्यंत डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटर मध्ये सहा आयर्न मॅन निर्माण झाले असून अजून येणाऱ्या काळात चौघेजण या खडतर स्पर्धेची तयारी करत असल्याची माहिती डॉ. मुस्तफा यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस तर लागतोच शिवाय खडतर क्रीडाप्रकारामुळे शरीराच्या तंदुरुस्तीला अधिक महत्व दिले जाते.
अतिशय आव्हानात्मक वातावरणात १८ ते ९९ वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात.
स्पर्धेची वेळ १६ तास असते. यात ३.८ किलोमीटर जलतरण, १८० किलोमीटर सायकलिंग तसेच ४२.०२ किमी. रनिंगचा समावेश होतो. या स्पर्धेत नाशिकच्या तिघा खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरीचा नमुना सादर करत नाशिकचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार गाजवले.
स्पर्धेसाठी लागलेला वेळ
प्रशांत डाबरी : १६ : २० : ३३
महेंद्र छोरीया : १६ : २० : ४१
डॉ. अरुण गचाले : १६ : २९ : ४२