Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीला तीन टीएमसी पाणी पोहचले

नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीला तीन टीएमसी पाणी पोहचले

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

जुन व जुलैच्या पंधरवडयापर्यंत नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून मराठवाडयाची तहान भागविणार्‍या जायकवाडी धरणाला तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. मोठया धरणांतून अद्याप विसर्ग सुरु नसला तरी पावसामुळे बंधार्‍यात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे मागिल दीड महिन्यात बंधार्‍यातून सातत्याने विसर्ग सुरु असल्याचे पहायला मिळते. गतवर्षी बंधार्‍यातून रेकाॅर्ड ब्रेक तब्बल १२१ टीएमसी पाणी जायकवाडिला पोहचले होते.

- Advertisement -

जूनच्या प्रारंभी निसर्ग चक्रिवादळाने जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. नाशिकसह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर जादा होता. त्यामुळे गोदावरी, दारणा, कादवा या नद्याची पाणी पातळित वाढ झाली होती. परिणामी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍याचे दरवाजे उघडून या वर्षीच्या हंगामात पहिल्यांदा विसर्ग करण्यात आला. २५७ दलघफू इतकी बंधार्‍याची मर्यादा असल्याने वरुन थोडे जरी पाणी वाढले तरी बंधार्‍यातून विसर्ग केला जातो.

निसर्ग चक्रिवादळामुळे जोरदार झालेल्या पावसामुळे बंधार्‍यातून ९ हजार क्युसेकने विसर्ग सुरु होता. त्यानंतर जूनच्या दुसर्‍या आठवड्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. ‍गोदेला छोटेखानी दोन तीन पूर येऊन गेले. तसेच दारणाची देखील पाणी पातळी वाढली होती. हे सर्व पाणी पुढे एकत्र होत नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात पडते. त्यामुळे देखील बंधार्‍यातून चार ते पाच हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु होता.

मागील दीड महिन्यात सात ते आठ दिवसांचा अपवाद सोडला तर रोज कमी अधिक प्रमाणात बंधार्‍यातून विसर्ग सुरु आहे. २०० ते ८०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. त्यामाध्यमातून आता पर्यंत तीन हजार दलघफू म्हणजे जवळपास तीन टीएमसी पाणी जायकवाडिला पोहचले आहे.

गतवर्षी बंधार्‍यातून आज पर्यतचा सर्वात अधिक ९३ हजार क्युसेकने नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीकडे विसर्ग सुरु होता. तब्बल १२१ टीएमसी पाणी मराठवाडयाला पोहचले होते.यंदा गंगापूर व दारणा ही दोन्हि धरणे ५० टक्के भरली आहे. अजुन तीन महिने पावसाचा हंगाम शिल्लक असल्याने यंदा देखील मोठया प्रमाणात विसर्गची शक्यता असून जायकवाडी पुन्हा शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या