Wednesday, July 24, 2024
Homeशब्दगंधवाघ्या मुरळी

वाघ्या मुरळी

– वैजयंती सिन्नरकर

- Advertisement -

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर

मुलांना जत्रेमध्ये एक एक लोककला दाखवत असतानाच संजयच्या कानावर शब्द पडले. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’. संजय मुलांना म्हणाला, हे वाघ्या मुरळी. वाघ्या व मुरळी या शब्दांच्या व्युत्पत्तीसंबंधित काही कथा, दंतकथा वाघ्या-मुरळी समाजात प्रचलित असून त्यांच्या जागरणात काही धार्मिक कथा सांगितल्या जातात. मुरळ्यांना आपण तिलोत्तमापासून आणि वाघ्यांना आपण चंपानगरीच्या राजांपासून निर्माण झालो असे समाधान थोडक्यात या कथांद्वारे मिळते. वाघ्या या शब्दाचे मूळ कन्नड भाषेत आढळते. त्याचे कन्नड नाव ‘ओग्गय्य’ असून हा शब्द ‘उग्गु’ या धातूपासून बनला आहे. यासंबंधीचे उल्लेख बाराव्या शतकापासून आढळतात. शब्दकोशात मुरळीची व्युत्पत्ती दोन प्रकारांनी दिली आहे. एक मैराळाची पत्नी ‘मैराली’, दोन (मुरई) यावरून आला असावा. वाघ्या व मुरळ्या सर्व दक्षिण महाराष्ट्रभर आढळतात.

संगती घेऊन मुरळीला.. वाघ्या चाललाय जेजुरीला.. असे म्हणत म्हणत ते जातात. वाघ्याचे ‘घरवाघ्ये’ व मदारवाघ्ये’ असे दोन प्रकार आहेत. घरवाघ्ये नवसाच्या फेडीसाठी काहीवेळ वाघ्याचा वेश परिधान करून वारी मागणारे असतात. खंडोबाविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी वाघ्याचे तात्पुरते रूप धारण करतात. याउलट दारवाघ्ये हे कायमची दीक्षा घेतलेले भिक्षेवर उदरनिर्वाह करत भक्तांचे धार्मिक कर्मे पार पाडणारे खंडोबाचे समर्पित भक्त असतात. भक्तांच्या वतीने जागरण करणे व लंगर (लोखंडी साखळी) तोडणे ही त्यांची विशेष कामे होत. वाघ्याचे हे जागरणाचे कार्यक्रम गोंधळाप्रमाणे असतात. त्यात रात्रभर एक वाघ्या तुणतुणे वाजवतो, दुसरा खंजिरी वाजवून गाणी म्हणतो व मुरळी नाचते. खंडोबाच्या यात्रेत जागोजागी वाघ्या आणि मुरळी यांचे कार्यक्रम चालतात. एका हाताने घोळ (घंटा) वाजवत मुरळी नृत्य करत असते.

खंडोबाची जेजुरीसहित अनेक क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एका ठिकाणी देवाची हळद लागते. पालीला देवाचे लग्न लागते आणि जेजुरीला देवाची वरात निघते. म्हणून या जत्रा एकामागून एक क्रमशः भरतात. रात्रभर घरासमोरील अंगणात वाघ्या-मुरळीच्या साथीने जागरण पार पडते त्याचप्रमाणे गोंधळही होतात. ‘जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या या..’ असे म्हणत जागरण होते तर गोंधळाच्या वेळेस ‘संबळ’ आणि ‘तुणतुणे’ ही वाद्य वाजवली जातात. गोंधळात ‘काकड्या गोंधळ’ आणि ‘संबळ्या गोंधळ’ हे दोन प्रकार दिसून येतात .

वाघ्या-मुरळी समाजाला विद्यमान प्रगत प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, त्यांना शैक्षणिक सुविधा, सवलती मिळाव्यात आणि त्यांनी संघटितरीत्या आपले प्रश्न सोडवावेत म्हणून त्यांच्या परिषदा, संमेलने भरवली जातात. संत साहित्यात वाघ्या- मुरळीचे चित्र दिसून येते. अशा पद्धतीने पूर्वकाळापासून चालत आलेले वाघ्या-मुरळी मुलांनो तुम्हाला आज नीट समजले ना? चला भराभरा पुढच्या लोककलेकडे जायचे आहे ना?

एकदा म्हणा मुलांनो

येळकोट, येळकोट जय मल्हार

- Advertisment -

ताज्या बातम्या