Monday, May 6, 2024
Homeब्लॉगतीर्थी धोंडा पाणी

तीर्थी धोंडा पाणी

गावातील प्रमुख काजीने काठोकाठ भरलेल्या पेला पाठवून नानकांना असा संदेश दिला होता की हे गाव धार्मिक विचार,संस्कार आणि आचार यांनी परिपूर्ण असून येथे तुमच्या ज्ञानाची काहीही आवश्यकता नाही. आपण आलात तसेच चालते व्हा. त्यावर नानकांनी सुंदर-नाजूक फुल टाकून त्याला असा संदेश दिला की कोणताही धर्म माणसातील स्वीकारवृत्ती आणि सहिष्णूवृत्ती वृद्धिगंत करून त्याचे जीवन सुंदर करण्यासाठी असतो.

तसेच ते नाजूक फुल आपल्या हलक्या वजनाने दुधावर तंरगले तसेच आध्यात्म हे माणसाला या जड जगाच्या बंधनांमधून मुक्त करून,भवसागरातून तरून नेण्यास पात्र करत असते. मला धर्माचे नेमके वर्म समजले आहे, त्यामुळे मी या भवसागरातून सहज तरून जाणार आहे. आपल्यासारखे दांभिक मात्र स्वार्थ साधण्यासाठी माणसांना धर्मवेडे करतात,इतर कोणते विचार चांगले असतील तरी त्यांचा स्वीकार करण्यास नकार देण्यास शिकवतात. यामुळे माणसांची स्वीकारवृत्ती व सहिष्णूवृत्ती नष्ट होते.

- Advertisement -

भगवान श्रीकृष्णाने ज्या भूमीवर अर्जुनाला गीतामृत दिले. अधर्मावर धर्माचा विजय निश्चित करण्यासाठी जी भूमी असंख्य योद्धांच्या रक्ताने न्हाऊन निघाली. हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या सर्व पूर्वजांचे पिंडदान जेथे केले जाते, ती कुरूक्षेत्राची भूमी. त्यामुळे कुरूक्षेत्र हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. कुरूक्षेत्रामध्ये एक गुरू-शिष्याची जोडी धर्मशाळेऐवजी एका सरोवराच्या काठी असलेल्या वृक्षाच्या छायेत मुक्कामाला होती. तीर्थक्षेत्री असलेले हे सरोवर आणि त्याचे घाट देखील पवित्र. त्यामुळे पवित्र स्नान आणि कर्मकांड करण्यासाठी जमलेली भाविकांची मांदियाळी आणि दानधर्माची चाललेली दिवाळी. असा प्राचीन काळापासून आजवर तीर्थस्थानी असलेला चिरपरिचित नजारा. हा सगळा खेळ सरोवराच्या काठावर बसलेल्या गुरू-शिष्यांचे मनोरंजन करत होता. गुरूने आपल्या शिष्याला रबाबाचे सुर छेडण्यास सांगितले आणि स्वतःच्या अलौकिक स्वरांनी गुरूवाणी प्रकट करण्यास सुरवात केली. गुरूवाणीत काही प्रश्न विचारले जात होते. ते म्हणजे, मित्रांनो ! तुमची ही स्नान-कल्पना तुम्हीच एकदा पडताळून पाहा. यामागे जर स्वच्छतेचा भाग असला तर तो योग्य मानता येईल. पण या निमित्ताने केवळ दानधर्म करणे आणि तोही काही ठराविकांना करणे यात कोणते औचित्य आहे? यातून नेमके काय साध्य होते गुरूवाणीचा स्वर आणि रबाबाचा स्वर हवेत विरत होता. वाल्टेयरच्या भाषेत सांगायचे झाल्यास, जे मुर्ख स्वतःला जखडून ठेवणा-या साखळदंडांना अलंकार म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात, त्यांना मुक्त करणे अशक्य असते. यामुळेच जगात सूर्य पाहिलेल्या माणसांच्या पदरी कायम अपयश व नैराश्यच आले आहे.

एक राजघराण्यातील स्त्रीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. नानकांची तेजःपुंज मुद्रापाहून हा गाणारा व्यक्ती कोणी सामान्य माणूस नाही हे तिला कळाले. नानकांच्या विचारांनी ती प्रभावीत झाली. तिच्या मुलाने शिकार करून आणलेले हरिण त्यांना अपर्ण करण्याची ईच्छा व्यक्त केली. नानकांनी त्याचा स्वीाकार केला आणि प्रसादभोजन तयार करण्याची आज्ञा शिष्याला दिली. सरोवराच्या परिसरात जे-जे मांसाहारी होते,त्यांना आवतनही देण्यात आले. यातून मोठा बाका प्रसंग तीर्थक्षेत्रावर उभा राहिला. तीर्थक्षेत्रावर आणि ते पण ग्रहण काळात मांसहारी भोजन. यामुळे पंडे,पुरोहित सारे नानकावर भडकले. त्यांचा नेता नानू पंडित यांनी नानकाचा शास्त्रचर्चेत पराभव करण्याची जबाबदारी स्वीकारली. नानू पंडित नानकाला म्हणाला, तुम्ही स्वतः नास्तिक त्यातून तुम्ही आमच्या पवित्र क्षेत्रात नीचांना त्यांच्या आवडीचे भोजन प्रसाद म्हणून देत आहात. तुम्हला धार्मिक आचार-विचार कळत नाहीत. खुशाल अस्पृश्यांना लाडावून ठेवता म्हणजे काय ? आम्ही तुम्हाला कठोर शासन करणार आहोत. सरोवराच्या घाटावर सारे स्तब्ध झाले. नानकदेव यावर शांतपणे उत्तरले, तुम्ही सारे लोक निव्वळ शाकाहारी आहत,हे म्हणणे आपण खरे धरून चालू या. पण जगात बरेच प्राणी मांसाहारी दिसतात. आपल्या समाजातही अनेक लोक मांसाहार करतात. वस्तुतः कोणी मांसाहार करतो म्हणजे तो पापी आणि फार जगावेगळा वागतो आणि एखादा करीत नाही म्हणून तो पुण्यवान आणि धार्मिक,असे म्हणण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही.

जगात कोणताही आहार हा शाकाहार असू शकत नाही. नानकानी मानव हा मिश्रहारी प्राणी आहे. तसेच जगातील कोणताही प्राणी निर्जिव आहार घेऊ शकत नाही. जगात जे सजीव आहे, तेच अन्न म्हणून ग्रहण करता येते. त्यांनी हे वैज्ञानिक सत्य याठिकाणी प्रकट केले. आहार हे पाप-पुण्य किंवा आस्तिक-नास्तिक यांचे परिमाण असू शकत नाही. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दिले. तसेच ग्रहण ही एक निसर्गातील नित्य घटना आहे. ग्रहणाचे अनिष्ट परिणाम माणसावर होण्याचा काही संबंधच नाही. अनिष्ट परिणाम आणि आपत्ती टाळण्यासाठी दानधर्म करावा,यामागे कोणताही तार्किक संबंध दाखवता येत नाही. आपण आहारावर विचार करण्याऐवजी मानवामानवात करत असलेल्या भेदाचा, शोषणाचा व धर्माच्या नावाखाली होणा-या पिळवणूकीचा विचार करावयास हवा. हे स्पष्ट केल्यानंतर नानू पंडित आणि इतर जण शांत झाले..जत्रा मे फत्रा बिठाया, तिरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी, पैसे की धुलधानी। असे सांगणार्‍या कबीरदासांना आणि तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥ असे सांगणा-या तुकोबारायांना जोडणारा दुवा म्हणजे नानक. धर्माच्या नावाखाली पोसल्या गेलीली दांभिकता,स्वार्थीपणा,शोषणवृत्ती यांना ठामपणे विरोध करणारे तुकोबाराय हा या पंरपरेचा संपूर्ण विस्तार सांगता येतो. नानकानी ज्याप्रमाणे हिंदू धर्मातील विसंगतींवर बोट ठेवले,तसेच त्यांनी मुसलमान मुल्ला-मौलवी-काजी लोकांनी चालवेल्या धर्माच्या धंद्याचाही समाचार घेतला आहे.

सर्वसामान्य मुसलमानांच्या डोक्यात स्वतःच्या स्वार्थासाठी कर्मठपणाचे खुळ भरवणा-या त्यांच्या धर्मगुरूंची दांभिकता नानकांनी वेळावेळी उघडी पाडली. नानक आणि मरदाना प्रवास करत असतांना एका मुस्लिम बहुल गावाजवळ पोहचले. हे मुस्लिम बहुल गाव त्या परिसरातील धार्मिक केंद्र देखील होते. अनेक मुल्ला-मौलवी-काजी यांची दुकाने तेथे थाटलेली होती. नानक व भाई मरदानांना गावाजवळ पोहचण्यास संध्याकाळ झाली. गावाबाहेरील एका विहरीजवळ दोघांनी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. नानक गावाबाहेर आले आहेत. याची खबर गावातील धर्माच्या ठेकेदारांना लागली. नानक गावात आले,तर त्यांच्या विचाराने आपले चेले आणि गावातील मुसलमान त्यांच्या प्रभावात येऊ शकतात. अशी भीती मुल्ला-मौलवी-काजी यांना वाटू लागली. हे सर्व त्यांच्या मुख काजीकडे जमले. त्यांना वाटत असलेली भीती त्याला ही सतावत होती. त्याने इतरांना आपण नानकाना गावाच्या बाहेरूनच चालते करून देऊ आश्वासन दिले. त्याने रात्रभर विचार केला आणि अखेर त्याला एक युक्ती सुचली. सूर्योदय झाल्यावर त्याने आपल्या नोकराला दुधाने काठोकाठ भरलेला पेला घेऊन पाठवले. नानकांच्या हातात देईपर्यत पेला काठोकाठ भरलेलाच असावा याबाबत नोकराला बजावले. आपल्या मालकाच्या बरहुकूम नोकराने त्याचे काम व्यवस्थित पार पाडले. नानकानी दुधाने काठोकाठ भरलेला पेला हातात घेतला. काही क्षण विचार करून त्यांनी ज्या विहिरीजवळ मुक्काम केला होता. तिच्या काठावर उगवलेल्या एका वेलीवरचे सुंदर-नाजूक फुल तोडले. ते फुल त्यांनी त्या पेल्यातील दुधावर आल्हादपणे ठेवले. ते नाजूक फुल सहजपणे त्या धुरावर तरंगले आणि त्याच्या तंरगण्याने पेल्यातील एकही थेंब दुध बाहेर ओघळले नाही. मग तो पेला नोकराला त्याच्या मालकाला परत करण्यास सांगितले. भाई मरदाना हा प्रकार बघत होते. नोकर गेल्यावर मरदानांनी नानकाना या कृतीचा अर्थ विचारला.

त्यावर नानक म्हणाले, गावातील प्रमुख काजीने काठोकाठ भरलेल्या पेला पाठवून मला असा संदेश दिला होता की हे गाव धार्मिक विचार,संस्कार आणि आचार यांनी परिपूर्ण असून येथे तुमच्या ज्ञानाची काहीही आवश्यकता नाही. आपण आलात तसेच चालते व्हा. त्यावर मी सुंदर-नाजूक फुल टाकून त्याला असा संदेश दिला की कोणताही धर्म माणसातील स्वीकारवृत्ती आणि सहिष्णूवृत्ती वृद्धिगंत करून त्याचे जीवन सुंदर करण्यासाठी असतो. तसेच ते नाजूक फुल आपल्या हलक्या वजनाने दुधावर तंरगले तसेच आध्यात्म हे माणसाला या जड जगाच्या बंधनांमधून मुक्त करून,भवसागरातून तरून नेण्यास पात्र करत असते. मला धर्माचे नेमके वर्म समजले आहे, त्यामुळे मी या भवसागरातून सहज तरून जाणार आहे. आपल्यासारखे दांभिक मात्र स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माणसांना धर्मवेडे करतात,इतर कोणते विचार चांगले असतील तरी त्यांचा स्वीकार करण्यास नकार देण्यास शिकवतात. यामुळे माणसांची स्वीकारवृत्ती व सहिष्णूवृत्ती नष्ट होते. जगातील सर्व धार्मिक संघर्षाचे मूळ येथेच दडलेले आहे. नानक मरदानाना हे कथन करेपर्यंत काजीपर्यंत त्यांचा संदेश पोहचला होता. नानकाच्या संदेशाने तो भानावर आला. आज त्याला धर्माची नेमके स्वरूप समजले होते.

प्रा.डॉ.राहुल हांडे । 8308155086

- Advertisment -

ताज्या बातम्या