अकोले |प्रतिनिधी| Akole
टोमॅटोचे भाव कोसळल्यामुळे अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील शेतकर्यांवर शेतातील टोमॅटोची झाडे उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. शेतात उपटून टाकलेली ही टोमॅटोची झाडे जनावरांना चारा म्हणून अन्य शेतकरी घेऊन जात आहेत. टोमॅटोची झाडे पिकअप, ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जात असल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
प्रवरा खोर्यातील उंचखडक बुद्रुक हे शेती क्षेत्रातील नावाजलेले गाव. या गावात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झालेली आहे.
मात्र सध्या टोमॅटोला भाव नसल्यामुळे 150 ते 180 रुपये कॅरेट म्हणजेच आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विकावे लागत आहे. या अल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकाला भाव मिळत नसल्याने संबंधित शेतकर्याने आपली टोमॅटोच्या शेतातील उभ्या पिकात नांगर घातला आहे. जनावरांना चारा म्हणून एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रॉली भरून ही टोमॅटोची झाडे दुसरीकडे नेण्यात येत होती.
उंचखडक बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब बाबुराव शिंदे, राजेंद्र कारभारी शिंदे व संजय गावंडे यांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी फळाने लगडलेली टोमॅटोची झाडे उपटून टाकली. अनेक पशुपालक जनावरांसाठी चारा म्हणून ट्रॅक्टर व गाड्या यांच्या द्वारे शेतात उपटून टाकलेली झाडे घेऊन जात आहेत.
काल शनिवारी दुपारी रस्त्याने एकाच वेळेला जाणार्या अशा तीन चार पिकअप, ट्रॅक्टर पाहून पाहणारे हळहळत होते.
पुढील उन्हाळी हंगामात टोमॅटो पिक वातावरणामुळे जमेल की नाही व बाजार भावाची हमी नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहे, गेली दोन वर्षे सतत शेतीमालाला भाव कमी मिळत असल्याने सर्व शेतकरी, शेतमजूर नाराज आहेत.
– महिपाल देशमुख, उपसरपंच, उंचखडक बु., ता. अकोले





