मुंबई / प्रतिनिधी Mumbai
वेतनश्रेणीत बदल करण्याबरोबरच लिपिक-टंकलेखक संवर्गाचे पदनाम बदलून मंत्रालय सहाय्यक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मंत्रालयातील लिपिकांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांनी आज दुपारी मंत्रालयाच्या आरसा गेट समोर आंदोलन पुकारले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची मागणी मंत्रालयातील लिपिक टंकलेखकांनी लावून धरली आहे. त्याचबरोबर चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन विसंगती दूर करावी आणि सातव्य वेतन आयोगातील बक्षी समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी आंदोलन सुरु झाले आहे. मंत्रालयात लिपिकांची चाळीस टक्के पदे रिक्त आहेत. याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
या आंदोलनाला ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’ने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मंत्रालयीन लिपिक संवर्गातील कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संपावर गेले आहेत. शासनाने याप्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करावी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले तर गैरवर्तवणूक समजून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. संपात सहभागी झाल्यास वेतन मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.




