– संदीप जाधव
दिवस बदलत गेले तशी नव्या कायद्यांची गरज भासत गेली. कित्येक नवीन कायदेही अंमलात आणले गेले. पण इच्छा मरणाच्या कायद्याची अनेक दिवसांची मागणी आहे. अनेकदा त्यावर ऊहापोह झाला आहे. इच्छा मरणाचा अधिकार मिळण्याची गरज व्यक्त करणारे ‘फंदी’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी (23 नोव्हेंबर) सादर झाले.
श्रीशिवाजीनगर (राहुरी) येथील नटेश्वर कला व क्रीडा मंडळाने सादर केलेल्या ‘फंदी’ या नाटकाचे लेखक रजनीश जोशी आहेत. ज्येष्ठ कलावंत राजेंद्र क्षीरसागर यांनी त्याचे दिग्दर्शन केले. गंभीर आजारपणात जेव्हा जगणे असह्य होते व त्यावर कुठलाही उपाय नसतो, अशा वेळी इच्छा मरणाला परवानगी द्यावी, असा आशय मांडणारी एका गुन्ह्याची कथा नाटकात होती. अशा गंभीर व महत्त्वपूर्ण विषयावरील संहितेला रंगमंचावर प्रभावीपणे मांडण्यासाठी तयारीही जोमाची हवी असते. मात्र, तसे न झाल्यास नाटक कसे फसते, हे या नाटकाच्या सादरीकरणातून स्पष्टपण जाणवले. अर्थात नाटक तीरावर नेण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला. इच्छा मरणाचा विषय मात्र प्रेक्षकांना उमगला.
पहिल्याच प्रसंगावरून तुरुंगात असलेल्या खुनातील फंदी या आरोपीला भेटायला वकील येतात. आरोपीची बाजू न्याालयात मांडण्याची तयारी दर्शवितात. मग हळूहळू नाटकातील पदर समजतात. फंदी हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून कार्यरत असतो. अफूची तस्करी करण्यास नकार दिल्यानंतर त्याची नोकरी जाते. घरी गरिबीची परिस्थिती असल्याने कॅन्सरपीडित वडिलांचा उपचार करण्यासही त्याच्याकडे पैसे नसतात. सरकारी रुग्णालयात जाऊनही पैशांची मागणी होत असल्याने वडिलांना घरी घेऊन येतो. मात्र, वडिलांना होणार्या प्रचंड वेदना त्याला सहन होत नाही. आजाराने हतबल झालेले वडिलही ‘मला मारून टाका’ अशी मागणी करतात. वडिलांना होत असलेल्या वेदना असह्य झाल्याने फंदी स्वतः गळा दाबून वडिलांना कायमचे मुक्त करतो. खुनाच्या आरोपावरून त्याला कोठडी मिळते. तेव्हा वकिलपत्र घेण्यासाठी एक वकील त्याला भेटायला येतात.
गुन्ह्यातून वाचण्याची सूतराम शक्यता नसल्याची भावना बाळगलेल्या फंदीला वकील आशेचा किरण दाखवतात. न्यायालयात खटला चालू शकतो याबाबत समजावतो. आरोपीचा जबाब, साक्षीदार, उलटतपासणी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद, साक्ष, पुरावे वगैरे बाबी समजण्यासाठी दोघेच आलटून-पालटून वेगवेगळ्या भूमिकेत जातात. साक्षीदारांच्या भूमिकेत फंदी संभाव्य प्रसंग चितारण्याचा प्रयत्न करतो. यातून मात्र आपण वाचणार नसल्याची खात्री त्याला वाटते. मग वकील रंगनाथन या नामांकित वकिलाला पाचारण करण्याची कल्पना सूचवतो. तो कसा युक्तिवाद करेल याबाबत पुन्हा प्रतिकात्मक खटल्याचा प्रसंग दर्शविला जातो. या वेळी मात्र रंगनाथन इच्छामरणाची गरज व्यक्त करतो. कायदा माणसांसाठी असल्याने याबाबत जुन्या कायद्याची नवी व्याख्याने व्हायला हवी यासाठी आग्रह धरतो. असाध्य आजारामुळे समोर मरण दिसत असताना जेव्हा जगणे केवळ वेदनाच देते तेव्हा इच्छा मरणाची गरज या वेळी अधोरेखित केली जाते. असह्य वेदनेच्या पाशातून कायमचे मुक्त करण्यासाठी वडिलांचा खून करणार्या फंदीबाबत विशेष विचार करून निकाल देण्यात यावा, अशी मागणी न्यायालयासमोर केली जाते. तेव्हा फंदीला गुन्ह्यातून सुटण्याची आशा दिसते. नंतर या खटल्याच्या निकालाचा निर्णय प्रेक्षकांवर सोपवून नाटक संपते.
इच्छामरणाच्या गंभीर विषयावरील या नाटकाची धाडसी निवड दिग्दर्शक राजेंद्र क्षीरसागर यांनी केली. मात्र, पात्रांची संख्या कमी असल्यावर भूमिका लांबलचक असतात. अशा वेळी पाठांतरावर अधिक भर द्यावा लागतो. त्यामुळे अनेक प्रसंगात ‘प्रॉम्प्टींग’चा आधार घ्यावा लागला. विंगेतून होणारे हे प्रॉम्प्टींग थेट प्रेक्षकांच्या कानी पडत होते. त्यामुळे कलाकारांचा कमी पडलेला सराव उघड झाला. काही प्रसंग ठीक वाटले. आठ वाजता सुरू झालेले हे दोन अंकी नाटक साडेनऊ वाजता संपले! फंदी हे पात्र डॉ. विकास शेळके यांनी सांभाळले. व्याकूळ अभिनय त्यांना चांगला जमला. साक्षीदार करीमतुल्ला व भोलानाथ यांचा साक्ष देताना त्यांचा अभिनय भावला. इतर पात्रही त्यांना चांगले सादर करता आले असते. वकीलाच्या भूमिकेत राजेंद्र क्षीरसागर होते. नाट्यकलेचा दांडगा अनुभव असतानाही त्यांचा अभिनय खुलायला हवा होता. दोन-तीन प्रसंगांत त्यांचा आत्मविश्वास मात्र दिसाला. मात्र, एकाच लयीतील हावभाव व संवादांचा विसर यामुळे त्यांना अभिनयाकडे फारसे लक्ष देता आले नाही. रंगमंचावरील अनावश्यक हालचालीही त्यांनी केल्या. वॉर्डरच्या भूमिकेत असलेले रविकिरण फुलपगार यांनी रंगमंचावर दोनदा येऊन नाटकातील अभिनयाची हौस भागवून घेतली.
नेपथ्य सुधीर ओहळ यांचे होते. अर्थात केवळ टेबल-खुर्च्या एवढेच प्रतिकात्मक नेपथ्य होते. नेपथ्याला चांगला वाव होता. प्रकाश योजना संजय वाणी यांची होती. केवळ एका प्रसंगांत लाल लाईट देण्याचे वेगळेपण होते. संगीत प्रतीक फुलपगार यांचे होते. प्रसंग परिणामकारक करण्यासाठी संगीताचा आणखी वापर गरजेचा होता. रंगभूषा प्रशांत सूर्यवंशी व वेशभूषा सविता खळेकर यांची होती. रंगमंच व्यवस्था राजेश मंचरे व संजय हुडे यांनी पाहिली. तुरुंगात कैद्यांना पुरवले जाणारे मादक पदार्थ, मोफत असूनही सरकारी रुग्णालयात करावा लागणारा खर्च, कायद्यातील बदल वगैरे वास्तववादी बाबीही नाटकाने मांडल्या. मात्र नाटकाचा अधिक सराव, पाठांतरावर भर, साजेसे नेपथ्य-संगीत असते तर नाटक उठावदार करण्यात मोठी संधी होती.
ग्रामीण भागातील कलाकारांना सोबत घेऊन नाटक करण्याचा दिग्दर्शक राजेंद्र क्षीरसागर यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेक नाटकं त्यांनी यापूर्वी चांगल्याप्रकारे सादर केली आहेत. मात्र, या वेळी त्यांची तयारी अपुरी पडल्याचे स्पष्ट दिसले. स्पर्धेत उतरताना नाटकाचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी दिग्दर्शकाची असते. मात्र, रंगभूमी जरी हौशी असली तरी प्रदीर्घ अनुभवी असलेल्या राजेंद्र क्षीरसागर यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मींकडून अशा नाटकाची अपेक्षा स्पर्धेसाठी तरी नक्कीच नाही.




