Thursday, May 2, 2024
Homeनगरप्रशिक्षणासाठी शिक्षकांना मोजावे लागणार पैसे

प्रशिक्षणासाठी शिक्षकांना मोजावे लागणार पैसे

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये फी भरावी लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने यासाठी फी आकारणी करण्यात आली होती. त्यासंदर्भात विविध संघटनांनी फी मागे घ्यावी अशी मागणी केली होती. मात्र त्याला परिषदेच्या संचालकांनी स्पष्ट नकार दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील पहिली ते बारावीच्या वर्गाला अध्यापन करणार्‍या शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ निवड श्रेणी देण्यात येते. एकाच पदावर चोवीस वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी देण्यात येते. यात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना आर्थिक लाभ होत असतो. गेले काही दिवस या स्वरूपाचे प्रशिक्षण व्हावे अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. 2019 मध्ये अशा स्वरूपाच्या प्रशिक्षणाची गरज नसल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्यास वित्त विभागाने मान्यता न दिल्याने अखेर तो निर्णय स्थगित करण्यात आला व प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांसाठी लागू करण्यात आला.

यासाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वीचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरती प्रशिक्षणाची जबाबदारी निश्चित केली होती. त्यानुसार परिषदेने ऑनलाईन लिंक सोडून नोंदणी करणे अनिवार्य केले होते. मात्र प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाला दोन हजार रुपये फी अनिवार्य केली व ती राज्य शासनाने आदेश दिले तेव्हाच तीही घेण्याची अनुमती दिलेली होती. मात्र शिक्षक संघटनांनी याला विरोध केला होता. शासनाने या प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने दोन हजार रुपये प्रत्येक शिक्षकाला भरावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रशिक्षणासाठी शासनाकडून निधी नाही

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वतीने या प्रशिक्षणाचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या प्रशिक्षणाचे ऑनलाईन नाव नोंदणी पोर्टल विकसित करणे, प्रशिक्षणाकरिता घटक संच निर्मिती, तज्ज्ञ तयार करणे, ध्वनिचित्रफीत तयार करणे, तज्ञांचे मानधन, हस्तपुस्तिका प्रमाणपत्र इत्यादी स्वरूपाचा खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यासाठी राज्य अथवा केंद्र सरकारकडून कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांकडून प्राप्त होणारी फी शिक्षकांच्या क्षमता समृद्धीसाठी, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण व अनुषंगिक बाबी साठी उपयोगात आणला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या