Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यासामाजिक प्रगतीसाठी त्रिसूत्री महत्वाची : किरण बेदी

सामाजिक प्रगतीसाठी त्रिसूत्री महत्वाची : किरण बेदी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सामाजिक प्रगतीकरता कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधन व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी केले.

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचा समारंभ किरण बेदी यांच्या उपस्थितीत झाला. माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी सायना भरूचा, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे उपस्थित होते.

बेदी यांनी सांगितले की, कामावर श्रद्धा ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवण्यास मिळतो. तरुणांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून काम केल्यास त्याचा आनंद खूप सुखावह असतो. विद्यार्थीदशेत असताना सर्वांनी कृतज्ञता, वेळेचे नियोजन आणि मानव संसाधनाचा योग्य पद्धतीने व्यवस्थापन यांचा अवलंब करावा. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्यासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे असतात. सामाजिक दायित्व व नैतिक जबाबदारी इत्यादींचे भान असणे आवश्यक आहे.

आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. यासोबत पेटंट पद्धतीकरतादेखील विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे. आपला समाजात वावर, विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन, क्रीडा यातून सकारात्मक विचारांची निर्मिती होते. विद्यापीठाने सांस्कृतिक, संशोधन व क्रीडाविषयक कार्यक्रमातून आपणास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. शुद्ध मनाने व विचारांनी सतत सकारात्मकतेने काम करत राहिल्यास आपण नक्कीच यशाचे भागीदार होणार. शाखानिहाय विशेष शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कारार्थींना विद्यापीठातर्फे बक्षीस रक्कम रुपये 25 हजार व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या स्पंदन सांस्कृतिक महोत्सव, आविष्कार संशोधन महोत्सव, इंद्रधनुष्य राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा प्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या