सटाणा | प्रतिनिधी Satana
महाविद्यालयात शिक्षण घेणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी भावा समवेत अजमेर सौदाणे गांवी दुचाकी वरून जात असतांना मालेगावच्या दिशेने जाणार्या ट्रकचा धक्का दुचाकीस लागल्याने विद्यार्थिनी खाली पडून ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सटाणा – मालेगाव रस्त्यावर हा अपघात झाला.
बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेली अजमेर सौंदाणे येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी मोक्षदा जगदीश बधान व तिचा भाऊ ओमकार शैक्षणिक कामकाज आटोपून अजमेर सौंदाणेच्या दिशेने स्कुटीवरून घराकडे जात असतांना मालेगाव रोड वरील बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोर मालेगावच्या दिशेने भरधाव जाणार्या ट्रकचा धक्का दुचाकीस लागल्याने स्कूटीवरील मागील बाजूस बसलेली मोक्षदा खाली पडून ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर स्कूटी चालवत असलेला भाऊ बाजूला फेकला गेला.
या अपघातामुळे मालेगाव रोड वरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. पोलिस पाटील रंजितसिंग पवार यांनी सटाणा पोलिसात अपघाताची माहिती दिली.मोक्षदाचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची बातमी समजताच नातेवाईक मित्रपरिवाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मोक्षदा ही पत्रकार जगदीश बधान यांची एकुलती एक मुलगी होती. बाजार समितीमधील व्यापारी व शेतकर्यांनी घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरिक्षक योगेश पाटील करीत आहेत.





