Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या लाचखोरीपासून दस्तुरखुद्द मंत्र्यांच्या आक्षेपार्ह चित्रफितीमुळे वादात सापडलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी मुंढे यांच्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

काही आठवड्यांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी बदली होऊन रुजू होण्याची संधी न मिळालेले तुकाराम मुंढे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली होण्यापूर्वी मुंढे हे दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत होते. या विभागात मुंढे यांनी दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय लाभ लाटणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंढे यांना महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांनी उद्या, बुधवारी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर नियमावर बोट ठेवून काम करण्याची ख्याती असलेल्या मुंढे यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

आज जारी झालेल्या आदेशानुसार पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर या विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे करण्यात आली आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. तर राज्य कामगार विमा योजना आयुक्त आर.एस. चव्हाण यांची बदली हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...